पुणे : शहरातील चौका चौकात उभारण्यात आलेल्या सीसीटीव्हीमार्फत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनांवर दंड आकारणी करण्यात येत असून आतापर्यंत पुणे शहरात ई चलनाद्वारे तब्बल ७७ कोटी ५२ लाख ५० हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
अनेकांना त्यांच्यावर दंड आकारणी करण्यात आल्याचे मेसेज येतात. परंतु, ते त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच वाहनचालकांचा मोबाईल नंबर वेगळा आणि सध्या वापरात असलेला वेगळा मोबाईल असल्याने त्यांना ई चलन मिळत नाही. त्यांच्यामुळे हा दंड साचत आहे.
ई चलनाद्वारे दंड आकारणी केली जात असल्याने बहुतांश वाहनचालक हा दंड भरत नाही. जेव्हा केव्हा रस्त्यावर वाहतूक पोलीस पकडतात. त्यांच्या वाहनांवर किती दंड आहे, याची तपासणी करतात. तेव्हा मात्र, त्यांना दंड भरण्याशिवाय पर्याय नसतो. यामुळेच वाहतूक पोलिसांनी कितीही दंड आकारणी केली तरी तो वसुल होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी झाले आहे.
या वर्षी सीसीटीव्ही मार्फत ई चलनाद्वारे ३१ जुलै २०२१ पर्यंत तब्बल ७७ कोटी ५२ लाख ५० हजार ५०० रुपयांचा दंड आकारणी करण्यात आली आहे. त्यापैकी केवळ १० कोटी ४५ लाख ९८ हजार १०० रुपये दंड वसुल झाला आहे. गेल्या वर्षी ८० कोटी ८६ लाख ३६ हजार ९५३ रुपये दंड आकारणी करण्यात आली होती. त्यापैकी २१ कोटी ३२ लाख ३९ हजार ५३ रुपये दंड वसुली झाली आहे. हे प्रमाण २६.३७ टक्के इतके होते. या वर्षी हे प्रमाण १३ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. गेल्या वर्षातील काही दंड वसुली ही या वर्षात झाली आहे.
असे फाडले जाते ई चलन
शहरातील चौका चौकात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. वाहतूक शाखेच्या येरवडा येथील नियंत्रण कक्षातून त्याद्वारे लक्ष ठेवण्यात येते. त्यात प्रामुख्याने विना हेल्मेट, झेब्रा कॉसिंगवर वाहन उभे करणे, सिग्नल तोडणे अशा काही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांवर तेथील पोलीस कर्मचारी कारवाई करतात. त्यांचा फोटो काढून वेळ, ठिकाण नोंदविला जातो. त्याद्वारे ही माहिती मुंबईतील मुख्य नियंत्रण कक्षाला कळविली जाते. तेथून संबंधित वाहनमालकावर ई चलनाद्वारे दंड आकारणी केली जाते. त्याचा मेसेज संबंधितांचा मोबाईलवर पाठविला जातो.