जुन्नर: तालुक्यात ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांची संख्या १ लाख १९ हजार ३९४ एवढी आहे. यातील ८५ हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. तर ८ हजार ८७३ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला आहे. असे एकून ९३ हजार ८७४ नागरिकांनी लस घेतली आहे. तालुक्यात ७९ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. तर ३४ हजार ३९३ नागरिकांनी अद्याप लस घेतलेली नाही. लसीचा दुसरा डोस अद्याप न घेतलेल्या नागरिकांची संख्या ७६ हजार १२८ अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी उमेश गोडे यांनी दिली.
जुन्नर ग्रामीण रुग्णालय, तसेच तालुक्यातील ओतुर,नारायणगाव प्रमुख आरोग्य केंद्रासह इतर उपकेंद्रावर लसीकरण सकाळी १० ते ४ या वेळेत करण्यात येत आहे. प्रथम आणि द्वितीय लस देण्याचे अंतरासह आवश्यक नियमावली रुग्णालयाकडे प्राप्त नाही. प्रथम लस घेतलेले नागरिक २८ दिवस ते ४५ दिवसांच्या अंतराने लस घेण्यासाठी येत आहेत. कोव्हीशिल्ड लस जर प्रथम घेतली असेल तर दुसरा डोस ४० ते ४५ दिवसानंतर घेण्यास सांगितले जात आहे.तर कोव्हॅक्सीन लस असेल तर मात्र दुसरा डोस २८ दिवसानंतरच दिला जात आहे.
दरम्यान, तालुक्यात १८ ते ४४ वयोगटापुढील नागरिकांची संख्या जवळपास अडीच लाखांहून अधिक आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने उरकण्यासाठी लसींचा पुरवठा त्या प्रमाणात होण्याची गरज आहे. या संदर्भात अद्याप शासनाचे धोरण नियोजन पातळीवर आहे. लसपुरवठा मिळविण्याचे देखील प्रशासनासमोर आव्हान आहे. नागरिकांना लसीकरणासाठी चकरा माराव्या लागू नये अशा प्रकारचे नियोजन सर्वच लसीकरणं केंद्रावर करण्यात आलेले आहेत. अपवादात्मक एखादा दिवशी लस उपलब्ध नसेल तर मात्र दुसऱ्याच दिवशी लस उपलब्ध केली जात आहे. एखाद्या आरोग्य केंद्रात लस नसेल तर जवळच्या दुसऱ्या गावात लस घेण्यासाठी देखील मुभा देण्यात आली आहे.