पुणे : महापालिकेच्या सुमारे सोळा हजार कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांसह सर्वांना, सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता रोखी मिळणार आहे. येत्या जूनपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.
महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त विभाग यांनी याबाबत महापालिकेच्या सर्व खात्यांना, परिमंडळ, क्षेत्रिय कार्यालये, माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग प्रमुखांना याबाबत पत्र दिले आहे. प्रत्येकाने आपल्याकडील कर्मचारी व अधिकारी यांना वितरित होणाऱ्या सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्याच्या रक्कमांचा तपशील बिले २७ मेपर्यंत ऑडिट विभागाकडून तपासून घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
महापालिकेच्या सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात याकरिता २५५ कोटी रूपये तरतूद विविध शिर्षकाखाली उपलब्ध आहे. यापैकी साधारणत: १५० कोटी रूपये हे तिसऱ्या हप्प्त्यापोटी वितरित केले जाणार असल्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा सह महापालिका आयुक्त उल्का कळसकर यांनी सांगितले.
दरम्यान महापालिकेतील जे अधिकारी / कर्मचारी १ जानेवारी २०१६ नंतर निवृत्त झाले आहेत. अशा अधिकारी व कर्मचारी व मयतांच्या वारसांना ७ व्या वेतन आयोगानुसार १ जानेवारी २०१६ ते सेवानिवृत्ती दिनाकांपर्यंत तिसऱ्या हप्त्याची बिले संबंधित खात्यांनी ऑडिट विभागाकडून तपासून घेण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. जून महिन्यात अनेक शाळा, महाविद्यालये सुरू होत असल्याने शैक्षणिक खर्च या महिन्यात मोठा असताे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने जूनपर्यंत सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता वितरित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळसकर यांनी सांगितले.