पुणे : महापालिकेच्या १५ हजार ७६ सेवकांना आजपासून (दि. १६) सातवा वेतन आयोग लागू झाला असून, यामुळे या सर्व सेवकांच्या मासिक पगारामध्ये सुमारे २३ टक्के वाढ होणार आहे़ तसेच सातवा वेतन आयोग जाहीर झाल्यापासून म्हणजेच १ जानेवारी, २०१६ ते ऑगस्ट, २०२१ मधील फरकाची रक्कमही समान पाच हप्त्यांमध्ये सर्व सेवकांना वितरित करण्यात येणार आहे़
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली़ सातवा वेतन लागू झाल्याने, महापालिकेच्या वर्ग १ ते ४ मधील सुमारे १५ हजार ७६ सेवकांना याचा लाभ मिळणार आहे़ सध्या या सेवकांसह कंत्राटी सेवकांवर महापालिका दरवर्षी साधारणत: १ हजार ९०० कोटी रुपर्य खर्च करीत आहे़ यापुढे आता पगारावरील खर्च हा सुमारे दोन हजार २०० कोटी रुपये इतका होणार आहे़, तर दरमहा महापालिकेच्या सेवकांना वितरित होणाऱ्या पगारात १५ कोटींनी वाढ होणार आहे़ दरम्यान, १ जानेवारी २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या सेवकांनाही या वेतन आयोगाचा लाभ होणार असून, त्यासाठी अंदाजे दरमहा दोन कोटी रुपये अतिरिक्त खर्च येणार आहे़
--------------------------