आंबेगाव तालुक्यात आत्तापर्यंत एकूण रुग्ण ४८७५ झाले आहेत, तर यापैकी ४६७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यातील ११९ लोक मयत झाले. तर, सध्या ५९ रुग्णांवर मंचरच्या उपजिल्हा रुग्णालयात व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. आज (दि. १७ रोजी) १२ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तालुक्यात एकाच ठिकाणी खूप संख्येने रुग्ण सापडत नाहीत. मात्र, जिल्हायात इतर ठिकाणी कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण पाहता तसेच कोरोनाच्या नवीन विषाणूचे रुग्ण मिळू लागल्याने सगळ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या पुढे वाढू शकते, ही भिती लक्षात घेता लोकांना सक्त ताकीद दिली जाणार आहे, विनामास्क फिरणाऱ्यांवर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले जाणार आहेत. मंगल कार्यालये, भाजी मंडई येथे होत असलेली गर्दी कमी करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. तसेच कोरोना झालेले रुग्ण बाहेर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले.
तालुक्यात रुग्णसंख्या जास्त वाढत नसली, तरी दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता लोकांनी विनामास्क फिरू नये, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, गर्दी करू नये. जर रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा कोविड केअर सेंटर सुरू केले जातील, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी सांगितले.