पुणे : बेकायदेशीर जात पंचायत बसवून श्री गौड ब्राह्मण समाजाबाहेर वाळीत टाकण्याच्या आरोपातून ८ जणांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. टी. शेजवळ काळे यांनी पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. नेमाराम चांदमल बोलद्रा (वय ४८, रा़ बिबवेवाडी), भरतलालजी रूपचंदजी धर्मावत (वय ६६, रा़ कोंढवा), देवाराम मंगनीराम धर्मावत (वय ६४, रा़ मार्केटयार्ड), गोविंद पोपटलाल डांगी (वय ५८, रा़ पर्वती दर्शन), भवरलाल मोहनलाल मावाणी (वय ५८, रा़ दत्तवाडी), भवरलाल कणीराम धर्मावत (वय ५५, रा़ कोथरुड), गोविंद लक्ष्मण धर्मावत (वय ५९, रा़ सिंहगड रोड), रामलाल कन्हैयालाल डांगी (वय ५५, रा़ बिबवेवाडी) अशी त्यांची नावे आहेत.याबाबतची हकिकत अशी, या प्रकरणी संतोष सुखलाल शर्मा (वय ४७, रा़ शुक्रवार पेठ) यांनी फिर्याद दिली होती. त्यांच्या मुलीने ब्राह्मण जातीच्या मुलीशी विवाह केला होता. ही घटना १९ मे २००४ नंतर काही दिवसांनी १० जुलै २०१३ दरम्यान घडली होती. आरोपी हे राजस्थानी 'श्री गौड ब्राह्मण' समाजाचे जात पंचाईतीचे अध्यक्ष व पंच आहेत, अशी फिर्याद संतोष सुखलाल शर्मा यांनी केली होती. आपले जात पंचायतीच्या अध्यक्ष व पंच या पदांचा दुरूपयोग करून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना तसेच ६ साक्षीदार त्यांच्या राजस्थानी 'श्री गौड ब्राह्मण' समाजाचे बाहेर वाळीत टाकून समाजातील सण, उत्सव, लग्न, अंत्यविधी, दशक्रिया विधी अशा धार्मिक विधीस जाणेकरिता मज्जाव करून धार्मिक कार्यक्रमास हजर राहिल्यास अपमानित केले होते. तसेच शिवीगाळ करून धार्मिक कार्यातून बाहेर काढून जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या आडदांड व खुनशी स्वभावामुळे वाळीत टाकलेल्या कुटुंबीयांना मानसिक त्रास देऊन समाजात परत घेण्यासाठी पैशाची मागणी केली होती. यावरून आरोपींच्या विरोधात बिबवेवाडी पोलिस ठाण्यात २०१३ मध्ये महाराष्ट्रातील पहीला जात पंचायतीचे आरोप असलेला व सामाजिक बहिष्काराचा गुन्हा दाखल झाला होता.खटल्यात सुनावणी दरम्यान सरकार पक्षाच्या वतीने ८ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालया समोर नोंदविण्यात आल्या. फिर्यादी व सर्व साक्षीदार यांनी वरिल सर्व आरोपींनी 'श्री गौड ब्राह्मण' समाजात पुणे शहरात बेकायदेशीर जातपंचायत चालवून आम्हाला वाळीत टाकून आमच्यावर सामाजिक अन्याय केला अश्या प्रकारच्या साक्ष न्यायालयात नोंदविल्या. आरोपींच्या वतीने अॅड मिलिंद द पवार व अॅड. अजय ताकवणे यांनी युक्तिवाद केला. आरोपीं हे 'श्री गौड ब्राह्मण' समाजातील अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती, मोठे उद्योजक व व्यावसायिक आहेत 'श्री गौड ब्राह्मण' समाजात आरोपींना मानाचे स्थान आहे. साक्षीदार यांना ट्रस्ट वर जाण्यासाठी व आरोपींना बदनाम करून त्रास देण्यासाठी तब्बल १० वर्षांनंतर खोटा खटला दाखल केला असून, साक्षीदार यांना वाळीत टाकले किंवा आरोपींनी 'श्री गौड ब्राह्मण' समाजात बेकायदेशीर जातपंचायत चालवली असा कुठलाही पुरावा फिर्यादी व साक्षीदार न्यायालयात सिद्ध करू शकले नाहीत असा युक्तीवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
पहिल्या जात पंचायत खटल्यातील ८ आरोपींची निर्दोष मुक्तता, पुराव्याअभावी सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 2:19 PM