लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत वाहने व पादचाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीतून तिघांना पकडून गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने ८ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून २० तोळे सोन्याचे दागिने, १४ किलो चांदी व रोख रक्कम असा २२ लाख ९ हजारांचा माल हस्तगत केला आहे.
सचिन ऊर्फ राहूल राजू माने ऊर्फ लखन अशोक कुलकर्णी (वय २८, रा.महंमदवाडी रोड हडपसर मूळ.पंढरपूर), सारंग ऊर्फ सागर संजय टोळ (वय २५), सनी महेशकुमार तनेजा (वय ३१, दोघेही रा. महंमदवाडी रोड, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचे इतर दोन साथीदार फरार झाले आहेत.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी पोलीस कर्मचारी नितीन मुंढे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, लोणीकंद ते फुलगाव रोड वढू खुर्द फाटा येथे अंधाराचा फायदा घेऊन सराईत गुन्हेगार दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, नितीन शिंदे, प्रतीक लाहिगुडे, विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे यांच्या पथकाने सापळा रचून तिघांना पकडले. यावेळी त्यांचे इतर दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी चिपळूण येथे घरफोडी केल्याची माहिती दिली. त्यांच्याकडून त्या घरफोडीत चोरी केलेला मोठा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.