पुणे : दुबईहून आलेल्या विमानातील एक प्रवाशाच्या सीटखालील लाईफ जॅकेटमध्ये २९ लाख रुपये किंमतीची ८ सोन्याची बिस्किटे सापडली असून ती तस्करी करुन आणण्यात आली होती़ सीमा शुल्क विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.आयातीवरील कर वाढविल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दुबईहून सोने तस्करी करुन भारतात आणण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे़ पुणे, पणजी, कोईमतूर अशा वेगवेगळ्या विमानतळावर तस्करी करुन आणलेले सोने पडण्यात सीमा शुल्क विभागाला यश आले आहे़ दुबईहून शनिवारी आलेल्या जेट विमानाची तपासणी करीत असताना सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांना २७ एफ या सीटच्या लाईफ जॅकेटमध्ये काळ्या सेलोटेपमध्ये गुंडाळून ठेवलेली ही ८ बिस्किटे आढळून आली़ त्यांचे वजन ९३३़११ ग्रॅम असून बाजारभावानुसार त्यांची किंमत २९ लाख १ हजार १७२ रुपये इतकी आहे़ यापूर्वी १८ आॅगस्ट २०१७ रोजी दुबईहून आलेल्या चौघांकडून १ कोटी ३८ लाख रुपयांचे ४ किलो ६८७ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले होते़ ९ आॅगस्टला पुण्याहून दुबईला १ कोटी ३० लाख रुपये किंमतीचे युरो व डॉलर घेऊन जाणार्या दोघांना पकडण्यात आले होते़ २६ आॅक्टोंबर रोजी एका प्रवाशाकडून ४४४ ग्रॅम सोन्याचे दागिने पकडण्यात आले होते़ २१ आॅगस्टला अबुदाबीहून तस्करी करुन आणलेले १ कोटी ६३ ग्रॅम सोने पुणे विमानतळावर पकडण्यात आले होते़ याबाबत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील उपायुक्त भारत नवले यांनी सांगितले की, दुबई, अबुदाबी येथून येणारी विमाने ही तस्करीच्या बाबतीत संवेदनशील असतात़ त्यामुळे या विमानांची संपूर्ण तपासणी सीमा शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी करीत असतात़ शनिवारी सकाळी दुबईहून आलेले आंतरराष्ट्रीय विमान पुण्यात उतरले़ ही फ्लाईट इंटरनॅशनल असली तरी पुण्याहून हे विमान नंतर डोमेस्टिक होऊन बंगलुरुला रवाना होणार होते़ त्यामुळे अशा विमानांची फार कसून तपासणी होते़ आज ही तपासणी करीत असताना २७ एफ सीटच्या खालीच असलेल्या लाईफ जॅकेटमध्ये काळ्या सेलो टेपमध्ये गुंडाळलेली ८ बिस्किटे आढळून आली़ त्यावर कोणी दावा केला नाही़ त्यामुळे ते बेनामी म्हणून जप्त करण्यात आले आहे़.
तस्करीचा नवा फंडादुबई-पुणे हे आंतरराष्ट्रीय विमान असल्याने पुण्यात सर्व प्रवाशांची कस्टम तपासणी होते़ परंतु, पुण्यातून हे विमान डोमेस्टिक होऊन बंगलुरुला जात असल्याने तेथे कस्टम तपासणी होण्याची शक्यता नसते़ त्यामुळे तस्कर अशाप्रकारे वेगवेगळे मार्ग हाताळताना दिसत आहेत़ दुबईला एक जण सोने घेऊन विमानात येतो़ तो पुण्यापर्यंत येतो़ सोने विमानातच लपवून ठेवतो़ पुण्यातून दुसरा साथीदार बंगलुरुला जातो़ उतरताना लपविलेले सोने घेऊन बाहेर निघून जातो, अशी नवी मोडस तस्कर अवलंबू लागले आहेत़ पण, सीमा शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचाºयांच्या सतर्कतेमुळे तस्करीचा प्रयत्न हाणून पडण्यात यश आले आहे़