माळेगाव : येथे नव्यानेच रुजू झालेल्या सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी सोमवारी माळेगाव पोलीस चौकीच्या वतीने विशेष मोहीम राबविली. या वेळी पोलिसांनी ८ हातगाडी धारकांवर कलम १०२ प्रमाणे खटले भरले. तसेच, रस्त्याच्या दुतर्फा रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या ‘पार्क’ केलेल्या १५ दुचाकींवर कारवाई करून चार हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.
माळेगाव येथील वादाच्या भोवऱ्यात होत असलेले अतिक्रमण १० जून रोजी नगरपंचायत प्रशासक तथा तहसीलदार विजय पाटील यांनी काढून टाकलेले होते. या वरील कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण होतच राहिले. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा कित्येकवेळा अपघात झालेले होते. माळेगाव येथे बस स्टँड चौकात फळे, पालेभाज्या विक्रेते व अतिक्रमण करून लावलेले वाढदिवसाचे फ्लेक्स बोर्ड व रस्त्याच्या दुतर्फा हात गाड्या लावून सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण करत असलेबाबत ग्रामस्थांनी तक्रार केली होती. घुगे यांनी ८ हातगाड्या धारकांवर कलम १०२ प्रमाणे खटले भरले. तसेच अडथळा ठरणाऱ्या १५ मोटरसायकलवर कारवाई करून चार हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच चौकातील अनधिकृतपणे लावण्यात आलेले फ्लेक्स नगरपंचायत अतिक्रमण विभागाच्या मदतीने काढून घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण चौक मोकळा झालेला दिसत आहे. कारवाईत सपोनि घुगे, पोलीस उपनिरीक्षक मोहिते, माळेगाव पोलिस चौकी स्टाफ, वाहतूक विभाग व बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या इतर कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारी शशिकांत वाघ, राजेंद्र काळे व दीपक दराडे यांनी सहभाग घेतला.
अतिक्रमणावर कारवाई करताना पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच नगरपंचायत कर्मचारी ट्रॅक्टरसह .
०६०९२०२१-बारामती-१०