पुणे : पीएमपी बसमध्ये प्रवाशांना सुट्ट्या पैशांच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. प्रवाशांच्या वारंवार मागणीमुळे पीएमपी प्रशासनाने नुकत्याच सुरू केलेल्या ‘यूपीआय’ तिकीट यंत्रणेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यंत्रणा सुरू झाल्यापासून अवघ्या ११ दिवसांत सात लाख ७३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून ३५ हजार प्रवाशांनी या यूपीआयच्या ‘क्यूआर कोड’द्वारे तिकीट काढून या ऑनलाइन सुविधेचा उपयोग करून घेतला आहे.
पीएमपीच्या सेवेत दिवसेंदिवस नवनवीन बदल केले जात आहे. यामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल होऊन सुरळीत होण्यास मदत होत आहे. ऑनलाइन तिकीट यंत्रणेत प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून बदल केले गेले. पूर्वी कागदी तिकीट वाटप यंत्रणा होती. त्यानंतर मशीनद्वारे तिकीट देण्याची यंत्रणा तयार झाली. मात्र, आता पीएमपीचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांच्या पुढाकारातून पीएमपी सुधारण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहे. यामध्ये स्वत: पीएमपीचे अध्यक्ष पीएमपी बसमध्ये प्रवास करून प्रवाशांच्या अडचणी समजून घेऊन बदल करीत आहेत. त्याचप्रमाणे क्यूआर कोड म्हणजेच यूपीआयद्वारे तिकीट काढण्याची यंत्रणा प्रवाशांना उपलब्ध करून दिली. प्रवाशांना सोयीचे व फायद्याचे होत आहे.
ऑनलाइन सुविधेच्या सुरुवातीला यंत्रणा राबविताना प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तसेच, वाहकांनादेखील सुरुवातील तांत्रिक अडचणी आल्या होत्या. मात्र, यूपीआय यंत्रणा सध्या व्यवस्थितपणे सुरू असल्याचे पीएमपी अधिकाऱ्यांनी सांगितले.
यूपीआयद्वारे मिळालेल्या कामकाजाची स्थिती...
- एकूण यूपीआय कॅश - ७,७३,०२६ रुपये- एकूण यूपीआय ट्रान्झॅक्शन - २९,५२५- एकूण प्रवासी संख्या - ३५,७८४
३५ हजार प्रवाशांनी लाभ घेतला
प्रवाशांच्या सेवेसाठी आणि सुट्ट्या पैशांमुळे वाहक आणि प्रवाशांमधील सातत्याने होणारे वाद थांबविण्यासाठी ऑनलाइन यूपीआय यंत्रणा १ तारखेपासून सुरू करण्यात आली. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ११ दिवसांत सात लाख ७३ हजार रुपयांचे उत्पन्न तर ‘क्यूआर कोड’द्वारे ३५ हजार प्रवाशांनी लाभ घेतला आहे. - सतीश गाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल