पुणे - राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपुष्टात येत आहे. त्यातच, जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची भूमिका जाहीर केली. त्यानुसार, २५ ऑक्टोबरपासून ते पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. सरकारने मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्याची मागणी सकल मराठा समाज आणि जरांगे पाटील यांच्यावतीने करण्यात येत आहे. त्यातच, बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा समाज बांधवांनी घेराव घातला होता. यावेळी, अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली.
अजित पवार रविवारी बारामती दौऱ्यावर होते, त्यावेळी विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानंतर त्यांनी बारामती तालुक्यातील पणदरे येथे सभा घेतली. या सभेनंतर मराठा समाजाच्या युवकांनी अजित पवारांना घेराव घातला. यावेळी मराठा युवकांनी आरक्षणाबाबत तुमची वैयक्तिक भूमिका काय असा प्रश्न अजित पवारांना विचारला होता. त्यावेळी, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लगता आरक्षण दिले जाईल ही सरकारची भूमिका आहे. वेगवेगळ्या घटंकाबरोबर मुख्यमंत्री यांनी बैठक घेतली आहे. त्यामध्ये माहिती घेतली असता, EWS म्हणजेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ मराठा समाजातील १० पैकी ८ टक्के लोक हे घेत असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
अजित पवार यांनी येथील सभेत बोलतानाही मराठा आरक्षणावर भाष्य केलं. वेळ मारून नेण्यासाठी काहीही करणारं नाही. कायद्याच्या कसोटीवर खरं उतरणारे आरक्षण देणार असून तसे प्रयत्न सुरू असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. मी देखील मराठा समाजात जन्माला आलो आहे. अजित पवारांच्या मुलांना आरक्षणाची गरज नाही. पण ज्यांना गरज आहे त्यांना मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडताना जर एकाला आरक्षण देताना दुसऱ्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार असेल तर, ते शक्य होणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
२५ ऑक्टोबरपासून पुन्हा उपोषण
मराठा आरक्षणासाठी शासनाला दिलेली मुदत संपली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आंदोलनाची दिशा काय असेल, याची माहिती देण्यासाठी मनोजर जरांगे पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सरकारने घेतलेल्या मुदतीत मराठा समाजाला सरसकट आरक्षण जाहीर केले नाही, तर २५ तारखेपासून आपण अन्नपाणी त्याग करून आमरण उपोषणास पुन्हा सुरुवात करणार आहोत. या कालावधीत उपचारही घेतले जाणार नाहीत. आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत कायद्याच्या पदावर बसलेल्या कोणत्याही राजकीय नेत्याला गावात येऊ दिले जाणार नाही. आरक्षण घेऊन आले, तरच गावाची शिव ओलांडू देणार आहोत.
सरकार टिकणारे आरक्षण देणार
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा शब्द मी दिला आहे. त्यामुळे माझ्या भावांनो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. कुटुंबासाठी तुम्ही लाखमोलाचे आहात, असे भावनिक आवाहन करतानाच सरकार कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.