पुणे : सैन्य दलाच्या कमांड हॉस्पिटलमध्ये माळी, क्लार्क पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने एका दाम्पत्याने तब्बल आठ जणांना आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, कोंढवा येथील ५२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विनायक कडाले आणि त्याची पत्नी दीपाली कडाले (रा. डीएडी कॉम्प्लेक्स, लुल्लानगर, कोंढवा) या दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मार्च २०२१ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक कडाले हा कमांड हॉस्पिटलमध्ये नोकरीला होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने ती नोकरी सोडली होती. फिर्यादी महिला आणि विनायक यांचा परिचय एका मॉलमध्ये झाला होता. त्यावेळी विनायक याने महिलेला कमांड हॉस्पिटलमध्ये आपला परिचय असून, तो क्लार्क, माळी यासह इतर जागेवर नोकरी लावू शकतो असे सांगितले.
फिर्यादी महिलेला त्याच्यावर विश्वास वाटल्याने त्याने तिच्या मुलीला कमांड हॉस्पिटलमध्ये नोकरी लावायचे आहे असे सांगितले. तीन लाख रुपयांत तो भरती करतो असे त्याने सांगितले होते. फिर्यादींकडून त्याने आठ जणांचे १३ लाख ५० हजार रुपये घेतले होते. हे सर्व पैसे रोख आणि बँकेद्वारे घेतले आहेत. दरम्यान नोकरी लागत नाही हे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी विनायक याच्याकडे पैशांची मागणी केली होती.
त्यातील अडीच लाख रुपये त्याने फिर्यादींना परत दिले. तसेच एक कोरा चेक दिला होता. विनायक याने फिर्यादींकडून घेतलेल्या पैशांत त्यांच्या नातेवाईंकाना व ओळखीच्या व्यक्तींना नोकरी न लावता पैसे देण्यास टाळाटाळ केली. याबाबत फिर्यादींनी सुरुवातीला कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक उसगावकर करत आहेत.