कामशेत (पुणे) : इंद्रायणी नदीवरील वडीवळे गावच्या हद्दीमध्ये नव्याने उभारण्यात येत असलेल्या पुलाशेजारीच वाहतुकीसाठी मातीचा भराव टाकण्यात आला होता. गुरुवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे नदीपात्रात भराव टाकून तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता गुरुवारी रात्री वाहून गेल्याने परिसरातील आठ गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील बुधवडी, वडीवळे, नेसावे, खांडशी, वळख, वेल्हवळी, सांगिसे, उंबरवाडी या गावांचा त्यामध्ये समावेश आहे.
सद्य:स्थितीत या आठ गावांना कामशेत शहराशी जोडणाऱ्या पर्यायी मार्गाची अवस्था बिकट असून स्थानिकांना मुंढावरेमार्गे वळख या कच्च्या चिखलमय रस्त्याने प्रवास करावा लागणार आहे. या पर्यायी मार्गाची वेळीच डागडुजी होणे गरजेचे होते. मात्र, या गंभीर समस्येकडे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेने कानाडोळा केल्याने नागरिकांना सुमारे १५ ते २० किलोमीटरचा वळसा घालून उंबरवाडीमार्गे गोवित्री ते कामशेत असा प्रवास करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत इंद्रायणी नदीवर वडीवळे गावच्या हद्दीमध्ये ७५ मीटर लांबीचा हा पूल निर्माणाधीन आहे. या पुलाची अंदाजित रक्कम पाच कोटी ८५ लाख ४१ हजार इतकी असून, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संघ पुणे यांच्या अंतर्गत हे काम सुरू आहे.
- उद्धव धापसे (अभियंता, ग्रामीण रस्ते विकास संस्था)