लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्याला बदली व्हावी, यासाठी धडपडणाऱ्या, सहकार विभागातील विशेष लेखा परीक्षकाने खासगी सावकारांकडून अव्वाच्या सव्वा दराने पैसे घेतले. बदली रखडली आणि खासगी सावकारानेही तगादा सुरू केला. त्यातून अधिकाऱ्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार पेठेतील बालाजी हाइट्स इमारतीमध्ये घडली.
गणेश शंकर शिंदे (५२) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांची पत्नी शोभना (४७) यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विजय राणतारा (३६), बाळकृष्ण क्षीरसागर (५६), गणेश साळुंखे (५०), मनीष हजरा (४६) यांना अटक केली. तसेच शंकर गायकवाड, विजय याचे वडील, पंधरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.शिंदे हे सहकार विभागाच्या मुंबई कार्यालयात विशेष लेखा परीक्षक होते. त्यांचे कुटुंब पुण्यात होते. शिंदे यांना पुण्याला बदली हवी होती. त्यासाठी संबंधितांना पैसे देण्यास त्यांनी सावकारांकडून १० ते १५ टक्के व्याजाने ८४ लाख कर्ज घेतले होते.
बारा पानी सुसाइड नोटशिंदे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने, ३ महिन्यांपासून ते घरीच होते. पत्नी मुलींना शाळेत सोडण्यासाठी गेल्या असताना, शिंदे यांनी बेडरूममध्ये पंख्याला गळफास घेतला. त्यांनी १२ पानी सुसाइड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी सावकार, मित्र, नातेवाईकांकडून कर्जावर पैसे घेतले होते, त्याची माहिती आहे.