पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांचे (असिम्प्टोमॅटिक) राज्यातील प्रमाण जवळपास ७५ ते ८० टक्के एवढे आहे; तसेच हे सर्व सर्वच वयोगटांत आढळून येत आहेत. त्यामुळे ते साध्या औषधोपचारानेही बरे होतात. जागतिक आरोग्य संघटनेने अशा रुग्णांमुळे इतर निरोगी व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी असल्याचे स्पष्ट केले आहे. पण संसर्गाची काही प्रमाणात का होईना शक्यता गृहीत धरून धोका न पत्करता दक्षता म्हणून या रुग्णांना विलग ठेवणे आवश्यक आहे.
कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांमुळे इतरांना संसर्ग धोका आहे का, याचे उत्तर हो किंवा नाही असे देता येणार नाही. खोकणे, शिंकणे किंवा थुंकताना त्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबातून विषाणू पसरतात. शरीर, रक्तात विषाणू किती प्रमाणात आहेत याला आपण व्हायरल लोड म्हणजे विषाणूंचा भार म्हणतो. या विषाणूंना पांढºया रक्तपेशी नष्ट करतात. पण विषाणू वाढल्यास गुंतागुंत वाढत जाते. पेशींची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने ताप, खोकला अशी लक्षणे दिसतात. न्युमोनिया होतो. तसेच विषाणूंचे प्रमाण जास्त असल्याने इतरांना संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो. असिम्प्टोमॅटिक रुग्णांमध्ये विषाणूंचे प्रमाण कमी असल्याने लक्षणे दिसत नाहीत. त्यांच्यातील प्रतिकारशक्तीमुळे विषाणू नष्ट होतात.