पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील अंतिम वर्षाचे सुमारे ८० टक्के विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देण्यास तयार असून उर्वरित २० टक्के विद्यार्थीच ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा नियोजित वेळेत घेऊन ऑक्टोबर महिना अखेरीस परीक्षेचा निकाल जाहीर करणे शक्य होणार आहे,असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पुणे, अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यांमधील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना १४ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देण्याचा पर्याय निवडण्यासाठी विकल्प अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली होती. सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत विद्यापीठाकडे २ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांपैकी २ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी विकल्प अर्ज भरला. त्यातील १ लाख ८३ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांसह ऑनलाईन पध्दतीने परीक्षा देण्यास पसंती दर्शविली आहे.त्यातही बरेच विद्यार्थी मोबाईलद्वारे परीक्षा देणार असल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. उर्वरित विद्यार्थी ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देणार आहेत. विद्यापीठातर्फे ऑनलाईन परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्नांची क्वेशन बँक तयार केली जात आहे. ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन ते तीन दिवस परीक्षेचा सराव करण्यासाठी अवधी दिला जाणार आहे. अंतिम वर्षाचा विकल्प अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे २ लाख २४ हजार नियमित विद्यार्थी तर सुमारे २० हजार बॅकलॉगचे विद्यार्थी आहेत.विद्यापीठातर्फे येत्या १ ते ९ ऑक्टोबर दरम्यान बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा तर १० ते २० ऑक्टोबर या कालावधीत नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. विद्यापीठाकडे विकल्प अर्ज भरलेल्या एकूण २ लाख २० हजार विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थी बॅकलॉकचे आहे.
पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील ८० टक्के विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 1:08 PM
अंतिम वर्षाचे १ लाख ८३ हजार विद्यार्थी देणार परीक्षा
ठळक मुद्देअंतिम वर्षाची परीक्षा नियोजित वेळेत घेऊन ऑक्टोबर अखेरीस निकाल जाहीर करणे शक्य होणार