राजगुरुनगर (पुणे) : दक्षणा फाउंडेशनमधील जेईई आणि नीट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या परराज्यातील सुमारे ८० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना (दि. २० रोजी ) घडली आहे. ४ विद्यार्थ्यांची प्रकृती जास्त खालावलेली असून २ विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. २२ मुले आणि ७ मुली असे २९ विद्यार्थ्यांना उपचारासाठी चांडोली (ता. खेड) येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
कडूस परिसरात दक्षणा फाउंडेशन ही गैरसरकारी व सेवाभावी संस्था आहे. ही संस्था ग्रामीण भागातील अभ्यासात हुशार असणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना आयआयटी व मेडिकल एन्ट्रान्सच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करते. राज्यभरातून गरीब विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. सध्या येथे सुमारे तीनशेपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील काही विद्यार्थ्यांना शुक्रवार (ता. १९) रात्री पासून अन्नातून विषबाधा झाल्याने जुलाब, डोकेदुखी, मळमळ व अंगदुखीचा त्रास जाणवू लागला. शनिवारी सकाळी विद्यार्थ्यांना अधिक त्रास होऊ लागल्यामुळे उपचारासाठी चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काही विद्यार्थ्यांना अधिक त्रास होत असल्याने त्यांना काही वेळ अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यादेखील प्रकृतीत सुधारणा झाल्यावर जनरल विभागात हलविण्यात आले. या विद्यार्थ्यांवर चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पूनम चिखलीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, डॉ. कौस्तुभ गरड, डॉ. मयुरी मालाविया,अल्ताफ पठाण यांनी उपचार केले. रुग्णालयात तहसीलदार प्रशांत बेंडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली.