४०० पेक्षा जास्त रुग्ण व नातेवाइकांची केली जेवणाची मोफत सोय
बारामती: कोरोना उपचार घेत असताना जेवणासाठी रूग्णांची होणारी अडचण त्यांनी पाहिली होती. उपचारातून बरे झाल्यानंतर बारामती शहरातील ८० वर्षांच्या आजी दररोज ४०० पेक्षा जास्त रुग्ण व नातेवाईकांसाठी मोफत जेवण पुरवून खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा ठरल्या आहेत.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाबरोबरच बारामतीतील विविध सामाजिक संस्था, संघटना, ग्रुप व व्यक्तिश: अनेक जण आपापल्या परीने वस्तू व सेवा स्वरूपात योगदान देऊन माणुसकीचे दर्शन घडवत आहेत. शहरातील देसाई इस्टेट येथील ८० वर्षीय सुशीला रतनचंद बोरा या आजींनी देखील मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. बारामतीत आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळत असल्याने बारामती शहर व तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील अनेक कोरोनाबाधित रुग्ण बारामतीतील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. बारामतीत रुग्णांना उत्तम उपचार तर मिळत आहेतच. मात्र टाळेबंदीमुळे सर्वच प्रकारची खाद्यपदार्थ मिळण्याची दुकाने बंद असल्याने अनेक रुग्णांसह नातेवाईकांच्या जेवणाची गैरसोय होत होती. ही गैरसोय कोरोनाचे उपचार घेत असताना सुशीला बोरा या आजींंना जाणवली. आणि त्या बऱ्या होऊन घरी जाताच गरजू रुग्ण व नातेवाईकांना जेवण उपलब्ध करून देण्याचा वसा घेतला.
सर्वांना निरोगी आयुष्य लाभावे, सर्वजण आनंदात राहोत, अशी भावना मनात घेऊन सुशीला बोरा या आजी मागील दोन आठवड्यांपासून गरजूंना जेवण पुरवत आहेत. प्रारंभी शंभर डब्यापासून सुरुवात केली. सध्या ४०० हून अधिक जेवणाचे डबे सुशीलाबाई स्वत: बनवून देत आहेत. यासाठी आपल्या वयाचा विचार न करता पहाटे सहा वाजल्यापासून डबे बनविण्यासाठी त्या तयार असतात. तांदूळ निवडणे,भाज्या कापणे,धुणे आधी सर्व कामे आजी स्वत: राबून करतात.
सुशीलाबाई मागील दोन महिन्यांपूर्वी रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेत होत्या. त्यांना घरून जेवणाचा डबा वेळेत मिळत होता. मात्र इतर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची जेवणावाचून मोठी परवड होत होती. हे सुशीलाबाईंनी रुग्णालयात असताना पाहिलं आणि गोरगरिबांसाठी त्यांच्या जेवणाची अडचण सोडवण्यासाठी कुटुंबीयांना सांगितले. त्यानुसार रुग्णांसाठी जेवण पुरवण्यास सुरुवात केली. असे भावना बोरा यांनी सांगितले. या कार्यासाठी महावीर बोरा, प्रवीण बोरा, भावना बोरा, सपना बोरा, हर्ष बोरा, देवेश बोरा कुटुंबासह सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव व त्यांचा मित्र परिवार मोलाची कामगिरी करीत आहेत.
--------------------------
कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी डबे बनवण्यासाठी सुशीलाबाईंची अगदी पहाटेपासून लगबग सुरू असते.
२३०५२०२१-बारामती-०२