समृद्धी मार्गातील एकाच प्रकल्पग्रस्ताला ८०० कोटी- विखे-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 01:47 AM2018-09-20T01:47:55+5:302018-09-20T01:48:22+5:30
महामार्गाच्या भूसंपादनात एकाच प्रकल्पग्रस्ताला तब्बल ८०० कोटी रुपये मिळाले आहेत, असा आरोप करीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला.
पुणे : मुंबई आणि नागपूरला जोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून राज्यात समृद्धी महामार्ग तयार करण्यात येत आहे. या महामार्गाच्या भूसंपादनात एकाच प्रकल्पग्रस्ताला तब्बल ८०० कोटी रुपये मिळाले आहेत, असा आरोप करीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला. संबंधित व्यक्तीचे नावदेखील माहीत असून योग्य वेळ आल्यानंतर ते जाहीर करणार आहे, असे ते म्हणाले. पुणे पत्रकार प्रतिष्ठानतर्फे आयोजित शोधनिबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. मात्र या आरोपांचे पुढे काय झाले? तसेच समृद्धी महामार्गाबाबत झालेल्या प्रकाराच्या सर्वांच्या मागे कोण आहे, असा सवालही त्यांनी केला. भाजपा सरकार राज्यात सत्ता येऊन चार वर्षे झाली. त्यादरम्यान त्यांनी सिंचन प्रकल्पावर किती काम केले, याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.