लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पावसाळ्यात दरडी कोसळून पुणे-मुंबई रेल्वे मार्ग बाधित होऊ नये म्हणून खंडाळा घाटातील तब्बल ८०० ठिकाणच्या धोकादायक दरडी हटविण्यात आल्या आहे. तसेच घाटातील घडोमोडी वर लक्ष राहावे म्हणून ५८ बोगद्याच्या प्रवेशद्वारवर १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहे. शिवाय ड्रोन कॅमेराची देखील व्यवस्था केली आहे.
दर वर्षी पावसाळ्यात दरडी कोसळून पुणे-मुंबई रेल्वे मार्ग बाधित होतो. त्यामुळे रेल्वे गाड्या उशिरा धावण्यापासून ते गाड्या रद्द करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर येते. यंदाच्या वर्षी मध्य रेल्वेच्या वतीने मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून खंडाळा घाटात धोकादायक दरडी शोधण्याच्या कामास सुरुवात झाली. यासाठी ५० कर्मचारी मेहनत घेत आहे. स्क्रीनिंग करून धोकादायक दरड शोधण्यात येते. त्यानंतर ती दरड दुरुस्त केली जाते.आता पर्यंत ८०० दरड ह्या रुळांपासून दूर केले आहे. शिवाय बोगद्यात देखील विविध उपाययोजना केली. ज्या बोगद्यात पाणी झिरपणे वा दगड पडणे या सारखे प्रकार घडत होते त्या ठिकाणी आतून स्टीलचा देखील वापर करण्यात आला आहे.
चौकट
२८ किमीवर ५८ बोगदे अन १०० सीसीटीव्ही
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर खंडाळा घाटातून २८ किमीचा मार्ग जातो. यावर ५८ बोगदे आहेत. पावसाळ्यात विशेषतः रात्री दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा वेळी मदत पोहोचविण्यात देखील अडचण येते. त्यामुळे रेल्वेने बोगद्याच्या दोन्ही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहे.त्यामुळे घाटातील परिस्थितीवर लक्ष ठेवणे सोयीचे होईल. शिवाय आपत्कालीन परिस्थितीत नेमक्या ठिकाणी मदत पोहोचवली जाईल.
कोट
पावसाळ्या पूर्वी ही कामे करणे गरजेचे असते. त्यामुळे आम्ही मार्चपासूनच याच्या कामाला सुरुवात केली. मेच्या अखेरपर्यंत ही कामे पूर्ण केली जातील.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई