सोमेश्वरनगर : गडदरवाडी(ता.बारामती)ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक दांपत्य ८० हजार रुपये खर्चून दुबईहून आले आहे. गडदरवाडीतील सचिन गोकुळ लकडे हे दुबई देशातील विमानतळावर कामाला आहेत.
गडदरवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक रविवारी शांततेत पार पडली. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते आपली पत्नी सरिता यांच्यासह थेट दुबईहून गडदरवाडीला दाखल झाले आहेत. त्यासाठी त्या दाम्पत्याला दोन्ही बाजू कडील विमान प्रवासासाठी तब्बल ८० हजार रुपयांचा खर्च आला आहे. मात्र असे असले तरी गाव कारभाराची धुरा योग्य व्यक्तीकडे जावी यासाठी मतदान करण्यासाठी आलो असून मतदान करून वेगळे समाधान मिळाल्याची भावना सचिन यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींसाठी रविवारी सुमारे ८१ टक्के इतके भरघोस मतदान झाले. चुरशीने झालेल्या या मतदानानंतर आता सबंध जिल्ह्याचे लक्ष मंगळवारी (दि. २०) होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. सर्वाधिक मतदान मुळशी तालुक्यात ८५.८२ तर सर्वांत कमी मतदान खेड तालुक्यात ७२.११ टक्के झाले. गावकी-भावकीच्या राजकारणात जिल्ह्यात चुरशीने मतदान झाल्याचे आकड्यांवरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील २२१ ग्रामपंचायतींसाठी रविवारी शांततेत मतदान झाले. त्यानुसार १८५३ सदस्यपदांसाठी व २२१ सरपंचपदांसाठी ही निवडणूक झाली. त्यापैकी ७१२ जागा बिनविरोध झाल्या. तर ७९ जागांसाठी एकही अर्ज आला नव्हता. २२१ सरपंचपदांपैकी ५ जागांसाठी एकही अर्ज आला नाही तर ४९ ठिकाणी बिनविरोध निवड झाली. २७ ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या. त्यानंतर रविवारी १७६ ग्रामपंचायतींमधील १०६२ सदस्य तर १६७ सरपंचपदांसाठी प्रत्यक्ष निवडणूक झाली.