जिल्ह्यातील 11 हजार 7 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दौंड, हवेली आणि आंबेगाव तालुक्यातील काही किरकोळ प्रकार वगळता संपूर्ण जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात 649 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 80.54 टक्के मतदान झाले. यामुळे तब्बल 11 हजार 7 उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी (दि.15) रोजी मतदान यंत्रात बंद झाले. आता सोमवार (दि.18) रोजी मतमोजणी होणार आहे.
कोरोना व लाॅकडाऊनमुळे लांबणीवर पडलेल्या 748 ग्रामपंचायतीच्या निवडणुकी जाहीर झाल्या. यात 95 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने शुक्रवारी 649 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. यात दौंड तालुक्यात दोन गटांत हाणामारी, हवेली तालुक्यात गाडी फोडली, आंबेगाव तालुक्यात दुबार मतदान असे काही किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. यात जिल्ह्यात सर्वाधिक 86.69 टक्के मतदान वेल्हा तालुक्यात तर सर्वात कमी हवेली तालुक्यात 73.98 टक्के मतदान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रथमच मोठ्याप्रमाणात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. त्यात गावकी भावकीचे राजकारणात ग्रामपंचायत निवडणुका अधिक चुरशीच्या झाल्याने सकाळ पासूनच मतदानसाठी मतदान केंद्रांवर लोकांनी रांगा लावून मतदान केले. पहिल्या दोन तासात 13.18 टक्के, सकाळी 11.30 पर्यंत 31.52 टक्के, दुपारी दीड पर्यंत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजे 51.03 टक्के मतदान झाले. दुपारी 3.30 वाजता जिल्ह्यात 66.22 टक्के मतदान झाले होते. अखेर जिल्ह्यात 80.54 टक्के मतदान झाले .
------
जिल्ह्यात तालुकानिहाय निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती व मतदानाची टक्केवारी
खेड -80 (82.04), भोर-63( 85 53), शिरूर-62(82.77), जुन्नर-59(76 55), पुरंदर-55(82.95) इंदापूर-57(81.92), मावळ - 49(81.76), हवेली- 45(73.98) बारामती- 4984 64), दौंड - 49(79.30) मुळशी - 36(76.27), वेल्हा - 20(86.69), आंबेगाव- 25 (76.99) एकूण : 649 (89.54)