पुणे : जिल्ह्यातल्या ८१ टक्के उद्योगांना अजूनही कोरोनापूर्व उत्पादन स्तर गाठता आलेला नाही. गेल्या दीड वर्षात कोरोना संसर्गाच्या दोन लाटा आल्या. यामुळे टाळेबंदी, निर्बंध, आर्थिक मंदी अशी संकटे उद्योगांवर आली. या परिस्थितीतून उद्योग-व्यवसाय मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँड अँग्रिकल्चर (एमसीसीआयए)ने कोरोना साथीच्या काळात केलेल्या चौदाव्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यातल्या दीडशेपेक्षा जास्त संस्था या सर्वेक्षणात सहभागी झाल्या होत्या. कोरोनापूर्व स्थिती गाठण्यासाठी पुणे जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला अजूनही दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
एप्रिलच्या तुलनेत मेमध्ये स्थिती काहीशी सुधारली असून उत्पादन पातळी एक टक्क्याने वाढून ७० टक्क्यांवर गेल्याचे बहुतेक कंपन्यांनी सांगितले. अजूनही तीस टक्के कर्मचारी वर्ग कामावर नसल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. सत्तर टक्के मनुष्यबळ काम करत आहे.
कोरोना पूर्व काळातील उत्पादन पातळी कधीपर्यंत गाठली जाईल, असा प्रश्न विचारला असता केवळ १९ टक्के कंपन्यांनी कोरोनापूर्व उत्पादन पातळी गाठल्याचे सांगितले. म्हणजेच जिल्ह्यातल्या ८१ टक्के कंपन्यांना अजूनही कोरोना पूर्व उत्पादन पातळी गाठता आलेली नाही. सर्वेक्षण झालेल्या कंपन्यांपैकी २९ टक्के कंपन्यांनी सांगितले की येत्या तीन महिन्यांत आम्ही कोरोनापूर्व उत्पादन स्तर गाठू तर २४ टक्के कंपन्यांनी ३ ते सहा महिने प्रतीक्षा करावी लागण्याचा अंदाज व्यक्त केला. सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागेल, असे २७ टक्के कंपन्यांना वाटते.
सर्वेक्षण झालेल्या कंपन्यांमध्ये अतिलघू, लघू, मध्यम आणि मोठ्या कंपन्या अनुक्रमे २०, २२, ३० आणि २८ टक्के होत्या. या सर्व कंपन्यांमधल्या ६९ टक्के कंपन्या उत्पादन क्षेत्रातल्या आहेत. सेवा क्षेत्रातल्या कंपन्या १३ टक्के आहेत तर १८ टक्के कंपन्या दोन्ही क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आहेत.