पुणे : तळोजा कारागृहाच्या पाठोपाठ येरवडा कारागृहात सर्वाधिक कैद्यांची संख्या असून कारागृहाच्या क्षमतेपेक्षा २०४ टक्के कैदी सध्या कारागृहात आहेत. त्यामध्ये १८ ते ४० या वयोगटातील तब्बल ८१ टक्के कैद्यांचा समावेश आहे.
येरवडा कारागृहातील कैद्यांची एकूण क्षमता २ हजार ४ ४९ इतकी असून त्यात पुरुष २ हजार ३२३ आणि स्त्री १२६ इतकी क्षमता आहे. सध्या येरवडा कारागृहात एकूण ४ हजार ९८७ कैदी आहेत. त्यामध्ये दोषसिद्ध पुरुष ९५५ आणि ६५ स्त्रीयांचा समावेश आहे. न्यायालयीन बंद्यांमध्ये पुरुष ३ हजार ७९४ तर स्त्री १५३ आहेत. त्याचबरोबर २० स्थानबंद कैदी आहेत.
कारागृहात खुनाच्या गुन्ह्यातील सर्वाधिक शिक्षा भोगणार्यांची संख्या ५७ टक्के आहेत. त्या खालोखाल जबरी चोरी, घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यात ११ टक्के कैदी शिक्षा भोगत आहेत. बलात्कार व खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यातील ६ टक्के कैदी आहेत. न्यायालयीन बंद्यांमध्ये खुनाच्या गुन्ह्यातील सर्वाधिक ३० टक्के गुन्हे सध्या कारागृहात आहेत. त्याखालोखाल जबरी चोरी, घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यातील २० टक्के, बलात्कार ११ टक्के, विनयभंग ४ टक्के, अपहरण ३ टक्के आणि इतर २३ टक्के गुन्हेगारांचा समावेश आहे.
.....
येरवडा कारागृहातील एकूण कैद्यांमध्ये
१८ ते २० वयोगटातील १३टक्के
२१ ते ३० वयोगटातील ३५ टक्के
३० ते ४० वयोगटातील ३३ टक्के
४० ते ५० वयोगटातील १३ टक्के
५० व त्यापुढील वयोगटातील ६ टक्के
............
महिला कैद्यांची संख्येपेक्षा अधिक
येरवडा कारागृहात महिला कैद्यांसाठी केवळ १२६ इतकी क्षमता आहे. ३० नोव्हेंबर २०२० नुसार सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ६५ आणि न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या १५३ अशा तब्बल २१८ महिला कैदी आहेत. क्षमतेच्या जवळपास दुप्पट महिला कैदी कारागृहात आहेत.
............
राज्यात सध्या सर्वाधिक कैदी येरवडा येथे ४ हजार ९८७ कैदी असून त्याखालोखाल तळोजा येथे ४ हजार ७५० कैदी आहेत. कोरोना संसर्गाच्या अगोदर येरवडा येथील एकूण कैद्यांची संख्या साडेपाच हजारांपर्यंत होती. कोरोनामुळे तब्बल साडेपाचशे कैद्यांना जामीन अथवा पॅरोलवर सोडण्यात आले. त्यामुळे ही संख्या पाच हजारापेक्षा कमी झाली आहे.