पुणे: इयत्ता दहावीच्या मूल्यांकन प्रक्रित शाळांच्या गुणदान प्रक्रियेसाठी केवळ तीन दिवस उरले असून, पुणे जिल्ह्यातील निकालाचे ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित मूल्यांकनाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न शाळांकडून सुरू आहे. मात्र, निकालास विलंब झाल्यास शाळांना जबाबदार धरले जाणार असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे.
राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच दहावीच्या निकालाचे सूत्र निश्चित करून शाळांकडून विद्यार्थ्यांचे गुण संपादन करण्याचे काम सध्या सुरू आहे. सर्व शाळांच्या शिक्षकांकडून सध्या निकाल तयार करण्याचे काम युद्धपातळीवर केले जात आहे.
पुणे विभागातून इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २ लाख ७१ हजार ५०३ असून त्यात मुलांची संख्या १ लाख ५० हजार ६९० तर मुलींची संख्या १ लाख २० हजार ७९७ एवढी आहे. एकट्या पुणे जिल्ह्यातून दहावीची परीक्षा देणारे एकूण विद्यार्थी १ लाख ४४ हजार ३८३ आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याची जबाबदारी आता शाळांकडे आली आहे. त्यामुळे निकालास विलंब झाल्यास शाळांना जबाबदार धरले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
-------
पुणे जिल्ह्यातील दहावीच्या निकालाचे काम सुरू असून जिल्ह्यातील ८२ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित निकालाचे काम तीन दिवसांत होऊ शकते. आवश्यकता भासल्यास शाळांना गुण जमा करण्यासाठी मुदतवाढ द्यावी लागेल.शिक्षकांना मूल्यमापन करताना अडचणी आल्यास राज्य मंडळाकडून त्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक संघ
----------------------------
जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी निकालाचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे. सुमारे जिल्ह्याचे ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी किंवा १७ नंबरचा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे गुण मिळवण्यात काही अडचणी येत आहेत. परंतु, त्यावर राज्य मंडळाकडून पर्याय सुचवला जात आहे.त्यामुळे निकालासाठी फारशा अडचणी येणार नाहीत.
- हरिश्चंद्र गायकवाड, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ, पुणे
--------------------------
पुणे विभागातील दहावीचे एकूण विद्यार्थी : १ लाख ५० हजार ६९०
मुलांची संख्या १ लाख ५० हजार ६९०
मुलींची संख्या १ लाख २० हजार ७९७
पुणे जिल्ह्यातील दहावीचे एकूण विद्यार्थी : १ लाख ४४ हजार ३८३