आसखेड - भामा-आसखेड धरणामध्ये सध्या ८३.१९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची साठवण क्षमता ८.१४ टीएमसी असून, धरण १०० टक्के भरले होते. पाण्याची पातळी ६६९.०२ मीटर असून, एकूण पाणीसाठा १९४.१४९ दशलक्ष घनमीटर व उपयुक्त पाणीसाठा १८०.६२७ दलघमी आहे. नुकतेच धरणामधून पाणी सोडण्यात आले होते. आलेगाव पागापर्यंत पाणी पोहोचल्यावर गुरुवारी रात्री विसर्ग बंद करण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता भारत बेंद्रे यांनी दिली.अनेक वर्षांपासून पुनर्वसन व काही प्रश्नांकडे जबाबदरीने लक्ष न देता आणि तातडीने निर्णय न घेतल्याने बाधित शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यास विरोध केला. त्यामुळे उशिराने दि. २७ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.२० वाजता १,१०० क्युसेक्सने, तर १२.२० वाजता १,६५३ क्युसेक्सने पोलीस बंदोबस्तात भामा-आसखेड धरणातून पाणी सोडण्यात आले होते. पाणी सोडण्यात आले, त्या वेळी १०० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तर, गतवर्षी झालेल्या सुमारे १,२९२ मिलिमीटर पावसामुळे (उशिरापर्यंत पडलेल्या) विहिरी-नाले समाधानकारक भरलेले होते. परंतु, यंदा फक्त ७७५ मिलिमीटरच पाऊस झाला आहे. त्यामुळे समोर येऊन ठेपलेल्या दुष्काळामुळे पाण्याचे नियोजन हा धरण प्रशासनापुढील गंभीर प्रश्न आहे. रब्बी हंगामातील पहिले आवर्तन २० आॅक्टोबर रोजी सोडणे अपेक्षित होते; परंतु धरणग्रस्तांच्या कित्येक वर्षांच्या प्रलंबित प्रश्नांमुळे त्यांनी केलेल्या विरोधामुळे ६ दिवस पाणी सोडण्यास उशिर झाला.परंतु, पाणी जरी उशिरा सोडले तरी खेड, शिरूर, दौंडला त्याचा मोठा फायदा होणार आहे.खेड, दौंड, शिरूरला फायदा : नदीकाठच्या गावांची भागली तहानखेड तालुक्यासह शिरूर व दौंड या तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना आणि शेतीसह विविध गावांच्या पाणी योजनांना पाणी मिळाले. तर, त्याबरोबर नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पूर्णपणे भरले आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या पाण्याचा फायदा खेडसह शिरूर व दौंड या तालुक्यांना होणार आहे. त्यामुळे हे धरण तिन्ही तालुक्यांतील शेतकरी व नागरिकांना कायमच वरदान ठरले आहे. तर, नदीकाठ जवळपासच्या गावांची तहान भागली आहे.
भामा-आसखेडमध्ये ८३ टक्के पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 1:01 AM