लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात तब्बल ७0 लाख लोकांचे लसीकरण झाले असले तरी यामध्ये अनेकांना ८४ दिवस होऊन गेले, तरी दुसरा डोस मिळालेला नाही. हे प्रमाण व दिवस असेच वाढत गेले तर लसीकरणाचा काही उपयोग होणार नसल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे. याचमुळे नाईलाजास्तव पुणे जिल्ह्यात सध्या केवळ दुस-या डोसला प्राधान्य देण्यात येणार असून, पहिल्या डोससाठी काही दिवस वाट पाहावी लागेल, असे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी येथे स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवार (दि.२0) रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात शहर आणि जिल्ह्याचा कोरोना आढावा घेण्यात आली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, आमदार ॲड. अशोक पवार, सुनील शेळके, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना पवार यांनी सांगितले की, शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोना चाचण्याचे प्रमाण अधिक असूनही रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे ही चांगली बाब आहे. परंतु केरळसह देशात आणि इतर देशात डेल्टाचे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोनाच्या तिस-या लाट लवकरच येऊ शकते. यासाठी आवश्यक सर्व तयारी जिल्ह्यात करण्यात येत आहे. नागरिकांनी देखील खबरदारी घेतली पाहिजे. कोरोनासोबतच काही भागात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत असून, आरोग्य यंत्रणेला वेळीच उपाययोजना करण्याचे आदेश दिले असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.