उरुळी कांचन: उरुळी कांचन येथील स्मशानभुमीमध्ये गॅसदाहिनीसाठी ८४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून काही महिन्यात ही दाहिनी कार्यरत होणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन यांनी दिली.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृतदेहाचे प्रचलित पद्धतीने दहन करणे जिकिरीचे होत आहे. त्यामुळे उरुळी कांचन सारख्या मोठ्या उपनगराच्या ठिकाणी गॅस शवदाहिनी असावी अशी मागणी सरपंच संतोष हरिभाऊ कांचन, उपसरपंच संचिता संतोष कांचन तसेच जिल्हा परिषद सदस्या कीर्ती अमित कांचन यांनी जिल्हा नियोजन समितीकडे केली होती. त्याबाबतचा प्रस्तावही दिला होता.
त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन यांच्या मागणीनुसार व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या शिफारशीच्या माध्यमातून या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत निधीची तरतूद करून प्रशासकीय मान्यता दिली.
अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांनी या कामासाठी ८३ लाख ९५ हजार रुपयांची तांत्रिक मंजुरी दिली आहे.या मागणीचा पाठपुरावा जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष आबासाहेब कांचन यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व आमदार अशोक पवार यांच्याकडे आग्रहाने करून हा निधी मंजूर करुन घेण्यात मोठा वाटा उचलला आहे.