पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील गोरगरिबांसाठी वरदान असलेल्या ससून रुग्णालयाला खासगी कंपन्या तसेच सामाजिक संस्थांकडून मागील तीन वर्षांत ८५ कोटी रुपये देणगीस्वरूपात मिळाले आहेत. देणगीदारांची ही ‘माया’ ससून रुग्णालयाचा कायापालट करत असल्याने रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत. राज्यात सध्या विविध प्रकारची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, अतिदक्षता कक्ष, रुग्णांना मिळणाऱ्या विविध सुविधा, यांमध्ये ससून रुग्णालयाचे स्थान वरचे आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येचे आव्हान पेलत बदलते तंत्रज्ञान व उपचार पद्धतींना आत्मसात करून रुग्णालयाने शासकीय रुग्णालयांमध्ये आपला ठसा उमटविला आहे. शासनाकडून मिळणाऱ्या निधीबरोबरच खासगी कंपन्या व सामाजिक संस्थांकडून देणगी स्वरूपात दिल्या जाणाऱ्या निधीमुळे हे शक्य झाले आहे. देणगीस्वरूपातील निधीच्या माध्यमातून अत्याधुनिक अन्नपूर्णा भवन, प्रत्येक वॉर्डात ई.सी.जी. मशीन, सर्व वॉर्डांचे नूतनीकरण, आय.सी.यू.चे नूतनीकरण, ५९ बेडच्या नवजात अतिदक्षता कक्षाची उभारणी, पचनसंस्थेच्या आजारांसाठी स्वतंत्र अत्याधुनिक कक्ष, कॅथलॅबचे नूतनीकरण,व्हेंटिलेटर,डिफेबीलेटर,लेझर मशीन, आॅपरेशन थिएटरमधील विविध यंत्रसामग्री, फॉगर मशीन यांसह विविध वैद्यकीय उपकरणे देणगीस्वरूपात मिळाली आहेत. तसेच रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांसाठीही विविध पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयामध्ये अनेक बदल होत असून, गोरगरिबांसह मध्यमर्गीय रुग्णही उपचारांसाठी ससूनला पसंती देऊ लागले आहेत.
ससूनवर देणगीदारांची ‘माया’ तीन वर्षांत ८५ कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 2:18 PM
राज्यात सध्या विविध प्रकारची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, अतिदक्षता कक्ष, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा यांमध्ये ससून रुग्णालयाचे स्थान वरचे आहे.
ठळक मुद्देतंत्रज्ञान व उपचार पद्धतींना आत्मसात करून रुग्णालयाने शासकीय रुग्णालयांमध्ये ठसा गोरगरिबांसह मध्यमर्गीय रुग्णही उपचारांसाठी ससूनला पसंती