पुणे : लोकसभा निवडणुकीत शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ८ विधानसभा मतदारसंघात ८५ मतदान केंद्रे संवेदनशील असून या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे़. हे सर्व मतदान केंदे्र समिश्र वस्तीत असून तेथे कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी आतापासूनच आवश्यक ती काळजी घेतली आहे़. पुणे शहरात निवडणुकीच्या काळात जातीय हिंसाचार उफाळून येण्याचा आजवरचा इतिहास नाही़ तसेच याबाबत कोणतीही इशारा अद्याप तरी पोलिसांकडे आलेला नाही़.
याबाबत विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी सांगितले की, शहरातील ८५ मतदान केंद्रे संवेदनशील असून त्या ठिकाणी आतापासून प्रतिबंधात्मक उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत़. स्वत: पोलीस आयुक्त डॉ़ के़ व्यंकटेशम यांनी शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना आदर्श आचार संहितेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत़. त्यांना आचारसंहितेची प्रतही उपलब्ध करुन दिली आहे़. तसेच पोलीस ठाण्याच्या स्तरावर स्थानिक संघटना, राजकीय कार्यकर्त्यांंशी संवाद समन्वय साधला जात आहे़. तसेच विशेष शाखेचे अधिकारी, कर्मचारी गोपनीय माहिती काढून कोठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेत आहे़.
- शहरात जे ८५ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत़ ती प्रामुख्याने समिश्र वस्तीमध्ये असून काही मतदान केंद्रे शहरातील मोठ्या झोपडपट्टीमधील आहेत़ काही ठिकाणी मतदानाची वेळ संपत असताना अचानक मोठी गर्दी होते़ अशावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी काळजी घेतली जाणार आहे़
- शहरातील निवडणुकीसंबंधातील सर्व घडामोडींचा नियमितपणे अहवाल निवडणुक आयोगाला पाठविला जात असून त्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येत आहे.
- निवडणुक काळात अवैध दारु, पैशांचा वापर होऊ नये, यासाठी नाकाबंदी, वाहन तपासणी अशा उपाय योजना करण्यात येत आहे़ तसेच नागरिकांना खुल्या मनाने मतदान करता यावे, यासाठी पोलीस ठाण्याच्या स्तरावर पथसंचलन करण्यात येत आहे.