लोणावळा : लोणावळा शहरात पावसाची संततधार कायम असल्याने मागील वर्षीची सरासरी पावसाने गाठली आहे़ आतापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे़ गुरुवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता़ मागील २४ तासांत शहरात १३८ मिमी पाऊस झाला़ मागील वर्षी २९ जुलै रोजी तब्बल २४० मिमी पावसाची नोंद झाली होती़राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने ओढ दिल्याने बळीराजा मेटाकुटीला आला असला, तरी घाटमाथ्यावरील लोणावळा शहरात पावसाने मागील वर्षीची सरासरी गाठली आहे़ या वर्षी जूनच्या ७ तारखेला जोरदार हजेरी लावून गायब झालेल्या पावसाने जूनच्या शेवटच्या आठवड्यात मात्र शहर व परिसरात पूरस्थिती निर्माण केली होती़ यानंतर तब्बल १० दिवसांची विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा संततधार सुरू केली. ती कमी-अधिक प्रमाणात कायम आहे़ मागील वर्षी ३० जुलैअखेर लोणावळ्यात २२३८ मिमी (८८़१४ इंच) पावसाची नोंद झाली होती. या वर्षी हा आकडा २३२४ मिमी (९१़५० इंच) एवढा आहे़ शहरात सरासरी चांगला पाऊस झाल्याने परिसरातील वलवण धरणात मुबलक पाणीसाठा झाला असून, भुशी, लोणावळा व तुंगार्ली ही धरणे भरली आहेत़ संततधार पावसाने शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे़ प्रशासनाने याकडे लक्ष पुरविणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत़ (वार्ताहर)द्रुतगतीच्या कामांचा फटका पर्यटन व्यवसायालामागील आठ दिवसांपासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा व खोपोली घाटात धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू असल्याने मुंबई व पुणे दोन्ही दिशेने जाणारी वाहतूक राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात येत आहे. त्यामुळे जुन्या महामार्गावर रोजच वाहतूककोंडी होत आहे. या वाहतूककोंडीचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी बाहेर न पडणेच पसंत केल्याने याचा फ टका पर्यटन व्यवसायाला बसला आहे़ मागील ‘विकएंड’ला तसेच इतर दिवसांमध्ये पर्यटकांची लोणावळ्यात तुरळक गर्दी राहिल्याने पर्यटनस्थळांसह रस्ते मोकळे पाहायला मिळाले़ चिक्की व हॉटेल व्यावसायिकांनादेखील याचा फ टका बसला़
गतवर्षीपेक्षा ८६ मिमी अधिक पाऊस
By admin | Published: July 31, 2015 3:54 AM