पुणे : राज्यात मुसळधार पावसामुळे एकीकडे शेती पिकांचे नुकसान होत असून धरणांमधीलपाणीसाठ्यात मात्र, झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत सर्व विभागांत मिळून ८६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला धरणांमध्ये ७० टक्के पाणीसाठा होता. यंदा सर्वाधिक ९४ टक्के पाणीसाठा कोकण विभागात जमा झाला असून दुष्काळी मराठवाड्यातही ७३ टक्के पाणीसाठा आहे. दरम्यान, राज्यामध्ये सप्टेंबरच्या पावसाने सरासरी ओलांडली असून आतापर्यंत १०३ टक्के पावसाची नोंद कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. पुण्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणे मिळून ९९.३१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
यंदा मॉन्सूनने वेळेवर हजेरी लावली. मात्र, जूनमध्ये पावसाचा जोर कमी होता. जुलै व ऑगस्टमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे या पाणीसाठ्यात आणखी वाढ झाली आहे. राज्यात आतापर्यंत सर्व धरणांमध्ये मिळून ८६.१८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सर्वाधिक ९४ टक्के पाणीसाठा कोकण विभागात असून दुष्काळग्रस्त मराठवाड्यातही ७३.५५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
राज्यातील सर्व विभागांमधील मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा ९१ टक्क्यांच्या पुढे आहे. कोकण विभागातील मोठ्या धरणांमध्ये ९८, पुणे विभागात ९७.५० तर नाशिक विभागातील धरणांमध्ये ९६.५९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे तर मध्यम प्रकल्पांमध्ये ७३.५४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मात्र, लघु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा तुलनेने कमी असून आतापर्यंत ५१.६१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला राज्यामध्ये सर्व धरणांमध्ये ७०.२५ टक्के पाणीसाठा जमा झाला होता.
दुसरीकडे राज्याची सप्टेंबर महिन्याची पावसाची सरासरी ११९.७ मिलिमीटर असून राज्यात आतापर्यंत १८५.३ मिलिमीटर अर्थात १०३ टक्के पाऊस झाला आहे. सप्टेंबरमधील २६ दिवसांपैकी आतापर्यंत सरासरी १७ दिवस पाऊस झाल्याची नोंद कृषी विभागाने केली आहे. सप्टेंबरमध्ये संभाजीनगर विभागात सरासरीच्या १३४.१६ तर टक्के पाऊस झाला आहे. तर पुणे विभागात एकूण सरासरीच्या ७२.९८ टक्के पाऊस पडला आहे.
धरणांमधील पाणीसाठाविभाग यंदाचा साठा गेल्या वर्षाचा साठा (टक्क्यांत)
नागपूर ८७.७५ ८४.४१अमरावती ८९.९२ ७६.२८
संभाजीनगर ७३.५५ ३४.५६नाशिक ८१.४८ ७१.५४
पुणे ९०.६८ ७५.२०कोकण ९४.२१ ९४.०५
एकूण ८६.१८ ७०.२५