समुपदेशनाचा आधार : भरोसा सेलच्या महिला कक्षाची भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पती-पत्नींचे नाते ‘तुझ माझं जमेना अन तुझ्यावाचून करमेना’ असे असू शकते. क्षुल्लक कारणांवरून जोडप्यात वाद होतात. दोघांंत अहंकार इतका असतो की कोणीच झुकते माप घ्यायला तयार नसते. वाद इतके विकोपाला जातात की थेट घटस्फोटापर्यंत गाडी घसरते. मात्र सामोपचार आणि संवादातून देखील टोकाला गेलेले संबंध सुधारतात. भरोसा सेलच्या महिला सहाय्यता कक्षाने असे तुटण्यापर्यंत गेलेले ८८२ संसार यंदा सावरले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कक्षाकडे येणाऱ्या तक्रार अर्जात वाढ झाली असून जवळपास २१०५ अर्ज आले.
‘संसार’ म्हटला की भांड्याला भांड लागतंच. कधी कोणत्या गोष्टीवरून दोघांपैकी एकाच्या रागाचा पारा चढेल हे सांगता येणे कठीण असते. याकरताच पती-पत्नीतले वाद मिटवण्यासाठीच भरोसा सेल कार्यान्वित करण्यात आला. या सेलच्या महिला सहाय्यता कक्षाकडून समुपदेशनाद्वारे बिघडलेले नातेसंबंध सुधारण्याचे आणि कौटुंबिक वातावरण सुदृढ करण्याचे काम केले जाते. कोरोनाच्या लॉकडाऊन काळापासून कौटुंबिक कलहाचे प्रमाण वाढले आहे. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे दोघेही घरातच असल्याने छोट्या वादांना धुमारे फुटून ही वादाची ठिणगी पार घटस्फोटापर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी महिला सहाय्यता कक्षाकडे २०७४ अर्ज आले. यातल्या १४४१ जोडप्यांमध्ये समेट घडवण्यात आला. मात्र दिवसेंदिवस जोडप्यांमधील तक्रारींचे वाढते प्रमाण चिंतेची बाब ठरत आहे.
चौकट
तक्रारींचे स्वरुप
-पती व सासरच्या लोकांकडून शारीरिक, मानसिक छळ
-पत्नी व तिच्या घरातील लोकांचा संसारातला हस्तक्षेप
-पती वा पत्नीचे विवाहबाह्य संबंध
चौकट
वादाची कारणे
१) दोघांचा प्रेमविवाह. रागाच्या भरात पतीने हात उगारला म्हणून पत्नीकडून घटस्फोटाची मागणी.
२) पत्नीने अंघोळ करून देवपूजा करून मग स्वयंपाकाला सुरूवात करावी ही पतीची अपेक्षा. मात्र पत्नी झोपेतून उठून लगेच स्वयंपाकाला लागते याचा पतीला येतो राग.
३) नवऱ्याची घरकामात मदत नाही, झोपेतून उशीरा उठतो म्हणून पत्नीचा पतीवर आक्षेप.
४) ‘पती व्हॉट्सअॅपला माझा डीपी ठेवत नाही,’ म्हणून पत्नीची तक्रार. सोशल मीडियात सतत व्यग्र असल्यावरून एकमेकांविरुद्ध तक्रारी-संशय.
५) शारीरिक संबंधांमधील असमाधान, बळजोरी, विकृती
चौकट
“पती पत्नींचे वाद आणि पीडित महिलांच्या अडचणी सोडविण्याचे काम करण्यासाठी आमच्याकडे १४ समुपदेशक आहेत. अनेकदा रागाच्या भरात पती-पत्नी एकमेकांविरुद्ध तक्रार देतात. मात्र दोघांमधला वाद पोलीस स्टेशन किंवा न्यायालयात न जाता संवाद, सामोपचाराने नाते टिकावे यासाठी आम्ही प्रयत्न करतो.”
-सुजाता शानमे, सहायक पोलीस निरीक्षक, महिला सहायता कक्ष, भरोसा सेल