पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नव्याने तयार करण्यात आलेला आकृतिबंध प्रशासन विभागाने विधी समितीला सादर केला असता, त्यास उपसूचना देत विधी समितीने आणखी १६ नवीन पदांची वाढ केली आहे. प्रशासनाने तयार केलेल्या आकृतिबंधात ८२ नवीन पदे निर्माण करण्यात आली होती, तर विधीने १६ पदे वाढविल्याने नव्याने निर्माण होणाऱ्या पदांची संख्या ९८वर पोहोचली आहे. विधी समितीने भरती प्रक्रियेऐवजी बढती पद्धतीने नेमणूक करण्यास प्राधान्य देत कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाल्याने अधिकारी, कर्मचारी भरतीचा, शैक्षणिक पात्रतेचा नवा आकृतिबंध प्रशासनाने तयार केला. नवा आकृतिबंध, सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम तयार करण्यात आले आहेत. प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा आणि अग्निशमन सेवा अशा सहा संवर्गांत करण्यात आले आहे. विधी समितीच्या सभेत त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यामध्ये विधी समितीने उपसूचना देत १६ नवीन पदांसह आणखी १७२ जागा वाढविल्या. महापालिकेतील एकूण ५८ विभागांसाठी ९ हजार १७८ जागा सरकारमान्य असून, विविध पदांच्या २ हजार ३९३ जागा नव्याने भरणे प्रस्तावित आहे. प्रस्तावित जागांमध्ये विधी समितीने १७२ जागांची वाढ केली आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ११ हजार ७४३ होणार आहे. महापालिका अंदाजपत्रकीय रकमेपैकी सध्या ३१ टक्के रक्कम कर्मचारी-अधिकारी यांच्या वेतनावर खर्च होत आहे. नवीन आकृतिबंधानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च ४३ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधीने १६ पदांची निर्मिती करून १७२ जागांची वाढ केल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्चाचा भार पडणार आहे. विधी समितीने नव्याने निर्माण केलेल्या पदांच्या नेमणुकीच्या पद्धतीत बढतीने जागा भरण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. विधीने नव्याने १६ पदे निर्माण करण्यास मंजुरी दिली असून, यापैकी १० पदांवर बढती प्रक्रियेने नेमणूक करण्याचे सुचविण्यात आले आहे. तर केवळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी उपप्राचार्य आणि सेवानियोजन अधिकारी ही पदे भरतीप्रक्रियेने उपलब्ध न झाल्यास बढतीनेच नेमण्याबाबत सुचविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)विधी समितीकडून वाढ करण्यात आलेली पदेसहशहर अभियंता (स्थापत्य), भांडार नियंत्रक, सहायक आरोग्य अधिकारी (दंत), उपप्राचार्य, सेवा योजना अधिकारी, सहायक भांडारपाल, विकास अभियंता (वि/यां), कार्यकारी अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ दूरसंचार अधिकारी, कनिष्ठ दूरसंचार अधिकारी, कुस्ती प्रशिक्षक, कॉम्प्युटर आॅपरेटर, विशेष अधिकारी, आर्ट आॅफिसर, आर्टिस्ट, मुख्य गाळणी निरीक्षक.अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता महापालिकेच्या विविध विभागांत अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कामकाजावर परिणाम होत असल्याची ओरड होत आहे. यातच दर महिन्याला दहा ते बारा अधिकारी, कर्मचारी निवृत्त होत आहेत. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांची संख्या वाढविण्यात आली. लोकसंख्याही वाढत आहे. त्या तुलनेत सुविधा पुरविताना अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे.
पालिकेत निर्माण होणार नवीन ९८ पदे
By admin | Published: April 12, 2016 4:28 AM