पुणे : प्रथम वर्ष वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त गुणांचा फायदा या वर्षी ९१९ विद्यार्थ्यांना झाला आहे. त्यामध्ये खेळाडू असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अतिरिक्त गुण मिळालेले विद्यार्थी अधिक आहेत.वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना प्राप्त केलेल्या गुणांमध्ये अतिरिक्त गुण एकत्रित करून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. खेळाडू, एनसीसी विद्यार्थी, हैदराबाद-गोवा मुक्ती लढा आणि स्वातंत्र सैनिकांच्या मुलांना मागील काही वर्षांपासून अतिरिक्त गुण दिले जातात. प्रत्येक गटासाठी दोन गुण ग्राह्य धरले जातात. मात्र, एखाद्या विद्यार्थ्याने विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळविले असेल, तर त्याला त्या प्रत्येक खेळासाठी प्रत्येकी दोन गुण दिले जातात. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना खेळासाठी आठ गुणही मिळाले आहेत. एकूण ९१९ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांचा लाभ मिळालेला आहे. सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त गुणांसाठी कागदपत्रे मागविण्यात आली होती. त्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत देण्यात आली होती. विद्यार्थ्यांकडून आलेल्या माहितीच्या आधारे त्यांना अतिरिक्त गुण देऊन अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश दिले जातील. खेळाडू असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण या यादीत अधिक आहे. तसेच एनसीसी विद्यार्थ्यांना या गुणांचा फायदा झाला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या पडताळणी वेळी संबंधित मूळ कागदपत्रे सादर करावी लागतील. कागदपत्रे सादर न केल्यास अतिरिक्त गुण रद्द करून या विद्यार्थ्यांचे केवळ सीईटीतील गुणच ग्राह्य धरले जातील. अनेक विद्यार्थ्यांना सीईटीच्या गुणात आठ गुण मिळाल्याने प्रवेशासाठी त्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यांना राज्य गुणवत्ता यादीतील क्रमांकात बदल झाल्याने चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेशाची शक्यता वाढली आहे. असे अतिरिक्त गुण केवळ वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच दिले जातात.सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण या वर्षी जास्त होते. त्यामुळे अतिरिक्त गुणांसाठी अर्ज करणारे विद्यार्थीही या वर्षी अधिक आहेत. एका खेळासाठी दोन गुण असे चार खेळांसाठी आठ गुण असलेले विद्यार्थीही आहेत. खेळ, एनसीसी व इतर दोन गटांचे प्रत्येक दोन गुण, असे एकूण आठ गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचाही यादीत समावेश आहे.- डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण संचालनालय
वैद्यकीयसाठी ९१९ जणांना अतिरिक्त गुणांचा लाभ
By admin | Published: June 12, 2016 6:10 AM