लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर : पाबळफाटा येथे वाघसदृश प्राण्याचे सुमारे एक कोटी रुपये किमतीचे कातडे विक्रीस आणलेल्या नऊ आरोपींना शनिवारी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून कातडे तसेच १० लाख रुपये किमतीच्या दोन मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याप्रकरणी मयूर मारुती कोळेकर (वय २२, रा. किवळे, ता. खेड, जि. पुणे), विनायक सोपान केदारी (वय ३०, रा. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे), साईराज विजय गाडे (वय २०, रा. खरपुडी, राजगुरुनगर), चिराग कैलास हांडे (वय २६, रा. मंचर, ता. आंबेगाव), कौस्तुभ महादू नायकवडे (वय २८, रा. मंचर, ता. आंबेगाव), वैभव अर्जुन गाडे (वय २०, रा. खरपुडी, राजगुरुनगर), शिवाजी किसन कुसळकर (वय ३०, रा. कडा, ता. आष्टी, जि. बिड), अमोल बाळू काशिंबे (ता. आंबेगाव, जि. पुणे), धनंजय जयराम पाटोळे (वय २२, रा. वडगाव पाटोळे, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर वन्य जीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील आरोपी वाघसदृश प्राण्याचे कातडे एक कोटी रुपयांना विकण्यासाठी येणार असल्याची माहिती
शिरूर पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक किरण उंदरे, पोलीस नाईक संतोष साठे, संजू जाधव, अनिल आगलावे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पिठले, संतोष साळुंखे, करण सिंग जारवाल, विशाल पालवे, सुरेश नागलोत, प्रशांत खुटेमाटे, गोरे यासह पथकाने शुक्रवारी (दि.५) ११ ला पाबळफाटा येथे सापळा रचला. आरोपी हे कातड्याच्या विक्री करण्यासाठी शनिवारी रात्री (दि.६) १२ च्या सुमारास आले. यावेळी पोलिसांच्या पथकाने त्यांना शिताफीने अटक केली. एका आरोपीकडून एक वाघसदृश प्राण्याचे पिवळसर तपकिरी, काळ्या रंगाचे पट्टे व जबड्याभोवती दात असलेले कातडे, १० लाख किमतीच्या दोन मोटार कार जप्त केल्या. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करीत आहेत.