लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील विविध भागात घरफोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून घरफोडीचे ९ गुन्हे उघडकीस आणत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ९ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
विकास सुनील घोडके (वय २४), कुलदीप तानाजी शिंदे (वय २७, दोघेही रा. वडगाव शेरी) आणि अजय सतीश दुशिंग (रा. चिखली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करण्यात येत होता. त्यावेळी विकास आणि कुलदीप भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे पोलीस कर्मचारी गजानन सोनुले व अजित फरांदे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी साथीदार अजय दुशिंग यासह घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केले. या आरोपींनी पुणे शहर परिसरात ९ घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
विकास सराईत घरफोडी करणारा असून त्याच्यावर ५१ गुन्हे दाखल आहेत. अजयवर ५ आणि कुलदीपवर १ गुन्हा असे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत.