लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मोबाईल विक्रीसाठी आलेल्या सराईत चोरट्याला पकडून त्याच्याकडून वाहनचोरी, घरफोडीचे ९ गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाला यश आले.
राेहन बिरु सोनटक्के (वय २१, रा. वारजे माळवाडी) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून १८ मोबाईल, ३ लॅपटॉप, साड्या व किराणा माल, एक दुचाकी व २ चारचाकी गाड्या असा १३ लाख ४० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. हडपसर, वानवडी, कोंढवा, मार्केटयार्ड, विश्रांतवाडी, पिपंरी आयुक्तालयातील चिखली व उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुम पोलीस ठाण्यातील घरफोडी व वाहन चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, हवालदार महेश वाघमारे, प्रविण काळभोर व दाऊद सैय्यद हे हडपसर परिसरात गस्त घालत असताना सराईत गुन्हेगार रोहन सोनटक्के हा ॲमनोरा मॉलच्या मागे मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना कळवून पोलीस पथकाने तेथे जाऊन सोनटक्के याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने ९ गुन्हे केल्याची कबुली दिली. सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे अधिक तपास करीत आहेत.