इंदापूर : सहकारातील कारखानदारीत कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने एकतीस वर्षाचा प्रवासात अनेक चढउतार पाहिले. मात्र ही संस्था कधीही डगमगली नाही. ऊस उत्पादक, सभासद, संचालक, कामगार, यांच्या मेहनतीच्या जीवावर हा प्रवास यशस्वी झाला आहे. कारखान्याने १४१ दिवसात चांगले नियोजन करून ९ लाख ३० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून उत्कृष्टरित्या हंगाम पार पाडल्या असे प्रतिपादन भाजपाचे नेते तथा कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
सोमवारी बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२० - २१ च्या ३१ व्या गळीत हंगामाची सांगता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गव्हाण पूजन करून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे तज्ञ संचालक भरत शहा, वंसत मोहोळकर, हनुमंत जाधव, सुभाष काळे, यशवंत वाघ, राहुल जाधव, केशव दुर्गे, राजेंद्र चोरमले, भास्कर गुरगुडे, मच्छिंद्र अभंग, मानसिंग जगताप, अंबादास शिंगाडे, विष्णु मोरे, अंकुश काळे, राजेंद्र गायकवाड, सुभाष भोसले, अतुल व्यवहारे, पांडुरंग गलांडे, जयश्री नलवडे यांच्यासह आदी उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, या हंगामात नऊ लाख तीस हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून ९ लाख ११ हजार १५० साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे .साखर उतारा सरासरी १०.९६ टक्के झालेला असून आसावणी प्रकल्पातून ५३ लाख १० हजार १६० लिटरचे उत्पादन झाले आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पातून १ कोटी ५३ लाख ३३ हजार ६०० युनिटची उत्पादन करण्यात आले आहे. कंपोस्ट खताची विक्री २४५७ मेट्रिक टन करण्यात आली आहे. तर सेंद्रिय खताच्या ७ हजार पिशव्यांपैकी ६४५३ पिशव्यांची विक्री झाली आहे तर २० हजार पिशव्या प्रोसेसमध्ये आहेत.
एकूण ६ हजार ८३५ लिटर्स जैविक खत विक्री, ५२ हजर १७४ घनमीटर बायोगैस उत्पादन केले आहे तसेच प्रेसमड उत्पादन १ हजार ९९६ मेट्रिक ट्रन व मोलॉसेस उत्पादन हे २७ हजार ५०० सी. हेवी व १९ हजार१५० बी. हेवी मेट्रिक टन घेतले आहे. माती व पाण्याचे ११९ नमुने तपासणी करण्यात आल्या आहेत.
०८ इंदापूर कर्मयोगी
कर्मयोगी कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता सभेत बोलताना माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व मान्यवर