पुणे : ड्रेनेज लाईनच्या कामाच्या बिलांच्या मंजुरीसाठी ठेकेदाराकडून १५ हजार रुपयांची लाच घेताना पकडलेल्या सहायक आयुक्ताच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) घेतलेल्या झडतीत तब्बल ९ लाख ७३ हजार रुपयांची रोकड आढळून आली आहे. हे पैसे कोठून आले, याचा तपशील ते देऊ न शकल्याने पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे.
सहायक आयुक्त सचिन चंद्रकांत तामखेडे (वय ३४), कनिष्ठ अभियंता अनंत रामाभाऊ ठोक (वय ५२) व शिपाई दत्तात्रय मुरलीधर किंडरे (वय ४७) या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री अटक केली होती. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता तिघांना ४ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
तक्रारदार ठेकेदाराने कोथरुड भागात ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम मिळाले होते. या कामाचे बिल कोथरुड क्षेत्रीय कार्यालयात सादर केले होते. या बिलाला मंजुरी मिळावी, यासाठी तक्रारदार ठेकेदाराने सहायक आयुक्त तामखेडे याची भेट घेतली. तेव्हा त्याने २५ हजार रुपयांची लाच मागितली. ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करताना तडजोडीअंती तामखेडे याने १५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार कोथरुड क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी सापळा रचला होता. तक्रारदार तामखेडेकडे गेले असता त्यांनी लाचेची रक्कम कनिष्ठ अभियंता ठोक याच्याकडे देण्यास सांगितले. ठोक याने ही रक्कम शिपाई किंडरे याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्वीकारताना किंडरे व इतर दोघांना पकडण्यात आले.
त्यानंतर तिघांच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यात तामखेडे याच्या घरी तब्बल ९ लाख ७३ हजार रुपयांची रोकड आढळून आली. त्याचे कोणतेही स्पष्टीकरण तामखेडे देऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांनी ते जप्त केले आहेत.