पुणे : परदेशात पिझ्झा शेफ म्हणून नोकरी देण्याचे आश्वासन देऊन साडेनऊ लाख रुपये घेऊन माल्टा देशातील एका बेकरीत साफसफाईचे काम करण्यास भाग पाडल्याप्रकरणी ट्रॅव्हल्स एजन्सी चालवणाऱ्या तरुणाविराेधात चतु:शृंगी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत खिलारेवाडी येथे राहणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाने चतु:शृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अनिकेत विश्वास बोथरा (वय २९, रा. दीप बंगला चौक) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च २०२२ पासून आतापर्यंत घडला.
आरोपी अनिकेत याचे फर्ग्युसन रस्त्यावर ट्रॅव्हल एजन्सीचे कार्यालय आहे. फिर्यादी तरुणाला अनिकेत याने परदेशात पिझ्झा शेफ या पदावर नोकरी देतो, असे सांगितले. त्यासाठी ११०० युरो पगार मिळेल, असे सांगितले. त्यानुसार त्यांना अगोदर साडेसहा लाख रुपये खर्च सांगण्यात आला. प्रत्यक्षात त्यांना अन्य खर्चही तुम्हालाच करावा लागेल असे सांगून, त्यांच्याकडून साडे नऊ लाख रुपये घेतले. त्यांना जानेवारी २०२३ मध्ये माल्टा येथे पाठविले. तेथे गेल्यावर त्यांना पिझ्झा शेफऐवजी एका बेकरीमध्ये क्लिनिंगचा जॉब दिला. तसेच पगार ९०० युरो दिला. त्याला त्यांनी नकार दिला, तर ड्रग्जच्या केसमध्ये अडकवेल, अशी धमकी दिली, तसेच इथून पळून गेला, तर कुटुंबाची आठवण आली म्हणून गेला असे वर्क परमिटवर नमूद करेन, अशी धमकी दिली.
या प्रकारानंतर त्याने आपल्या बहिणीला फोन करून ही सर्व माहिती सांगितली. तिने भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. हा तरुणही भारतीय दूतावासात गेला. त्यांच्या मदतीने तो भारतात परत आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.