पालिकेच्या महत्वाकांक्षी 'एचसीएमटीआर' साठी ९ मीटरचा पर्याय? 'निओ मेट्रो' चा विचार केला जाण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 08:47 PM2020-06-22T20:47:08+5:302020-06-22T20:50:01+5:30
''एचसीएमटीआर'' या ३६ किलोमीटरच्या उन्नत रस्त्यासाठी चढ्या भावाने निविदा आल्यामुळे ही प्रक्रियाच रद्द करण्यात आली आहे.
पुणे : महापालिकेच्या महत्वाकांक्षी 'एचसीएमटीआर' प्रकल्पासाठी आता ९ मीटरच्या पयार्यावर विचार सुरू असून नाशिक आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी नियोजित केल्याप्रमाणे 'निओ मेट्रो' चा विचार केला जाण्याची शक्यता आहे. एचसीएमटीआर प्रकल्पाची 'प्रोजेक्ट कॉस्ट' कमी करणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
''एचसीएमटीआर'' या ३६ किलोमीटरच्या उन्नत रस्त्यासाठी चढ्या भावाने निविदा आल्यामुळे ही प्रक्रियाच रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी नव्याने प्रकल्प अहवाल (रिव्हाईज्ड प्लॅन) तयार करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही एचसीएमटीआर प्रकल्प प्रस्तावित असून हा प्रकल्प' निओ मेट्रो' असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही शहरांनी वेगवेगळे प्रकल्प करण्यापेक्षा एकसारखे प्रकल्प करण्याची सूचना केली होती.
शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरांना जोडण्यासाठी १९८७ च्या विकास आराखड्यातील एचसीएमटीआर प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, ५ हजार १९२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी सुमारे ४५ ते ५० टक्के अधिक दराने निविदा आल्या. या पैकी कमी दराची निविदा ७ हजार ५२५ कोटी रुपयांची होती. ती गावर व लॉगजियान या चीनच्या कंपनीने संयुक्तरित्या भरली होती. तर दुसरी ७ हजार ९६६ कोटी रुपयांची निविदा ही वेलस्पन, अदानी ग्रुप आणि सीसीटीईबीसीएल या चीनच्या कंपनीने संयुक्तरित्या भरली होती.
पुण्याच्या एचसीएमटीआर या उन्नत रस्त्यावर एकूण सहा पदर प्रस्तावित होते. यातील दोन पदर सार्वजनिक वाहतुकीसाठी नियोजित होते. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा प्रस्तावित एचसीएमटीआर हा निओ मेट्रो अर्थात ट्रामच्या पद्धतीचा होता. हे दोन्ही उन्नत मार्ग एकमेकांच्या अगदी जवळून जात असून पुण्याच्या ३६ आणि पिंपरी-चिंचवडच्या ३१ किलोमीटरच्या दोन्ही मार्गाचा आठचा आकडा तयार होतो. दोन्ही शहरे एकमेकांशी अगदी सलगतेने जोडलेली असल्याने दोन्ही शहरांमधील नागरिक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करीत असतात. त्यामुळे हे दोन्ही मार्ग एकसारखेच तयार केल्यास नागरिकांचा फायदा होईल. हे दोन्ही मार्ग वेगवेगळ्या पद्धतीचे करण्यापेक्षा एकसारखेच करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करणार आहे.
---
एचसीएमटीआर रस्त्याची लांबी ३६ किमी होती. तर रुंदी २४ मीटर नियोजित करण्यात आली होती. २४ मीटर रुंद रस्त्यावर एकूण ६ पदर नियोजित करण्यात आले होते. पालिकेची आर्थिक स्थिती पाहता प्रकल्पाची किंमत कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी हा प्रकल्प २४ मिटरवरून ९ मीटर करण्याचा विचार सुरू आहे.
--------
एचसीएमटीआर ९ मीटर केल्यास या रस्त्यावर केवळ दोनच मार्गिका उपलब्ध होऊ शकतील. यासंदर्भात सल्लागार महापालिकेला सादरीकरण करून माहिती देणार होता. परंतु, लॉकडाऊन लागू झाल्यामुळे हे सादरीकरण होऊ शकले नव्हते. ते आगामी काही दिवसात होण्याची शक्यता आहे.