पुणे : महापालिका प्रशासनाने शहरात निर्माण होणाऱ्या कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागांत २५ कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारले; परंतु त्यांपैकी अनेक प्रकल्प बंद पडले असून, काही प्रकल्प पूर्ण क्षमतेने कधी सुरूच झालेले नाहीत. तर, काही प्रकल्प देखभाल-दुरुस्तीसाठी सातत्याने बंद ठेवले जातात. कचरा प्रकल्पाच्या नावाखाली महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.सजग नागरिक मंचाने केलेल्या पाहणीत आणि प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून वरील बाब समोर आली आहे.यामध्ये शहरात दररोज हजारो टन कचरा निर्माण होतो. शहरातील कचरा शहरात जिरवण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. यामुळे शहराच्या विविध भागांत पाच-दहा टन असे लहान-लहान स्वरूपाचे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आले.तर येरवडा, वडगाव १, वडगाव २, घोले रोड, वानवडी या ५ प्रकल्पांत एकही युनिट वीजनिर्मिती झालेली नाही. तसेच पेशवे पार्क २, घोले रोड, वडगाव १, वडगाव २ या प्रकल्पांमध्ये ४५ टक्क्यांपेक्षा कमी कचरा जिरवला गेला असून, एकूण दररोज १२५ टन कचरा जिरविण्याची क्षमता असणाºया या २५ प्रकल्पांत मिळून सरासरी ६५ टक्के कचरा पाठविला गेला असल्याचे आढळून आले आहे. या सर्व प्रकल्पात पाठवलेल्या कचºयापासून या प्रकल्पांमध्ये फक्त ५३ टक्के क्षमतेने गॅस निर्मिती झाली आहे.तसेच, या ५ टनांच्या २५ प्रकल्पांमध्ये दरमहा ४,५०,००० युनिट वीजनिर्मिती होणे अपेक्षित आहे, ज्यातून मनपाचे दरमहा २८ लाख रुपये वीजबिल बचत होऊन वर्षभरात ३.५० कोटी रुपये वाचणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात वर्षभरात वीजनिर्मिती फक्त ३१ टक्के क्षमतेने झाली असल्याचे सजगचे विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. याबाबत प्रशासन ठोस कारवाई करीत नसल्याने नागरिकांच्या पैशांचा कचरा होत असल्याचा आरोप वेलणकर यांनी केला आहे.
शहरातील २५ कचरा प्रकल्पांपैकी ९ प्रकल्प बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 2:19 AM