पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असताना ड्रग्स रॅकेट चालविणारा आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेल्या ललित पाटील प्रकरणी एका अधिकाऱ्यासह ९ पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले आहे. ड्रग्ज विक्री प्रकरणात ४, तर ससूनमधून पलायन केल्याप्रकरणी महिला अधिकाऱ्यासह ५ जणांचा त्यामध्ये समावेश आहे.
ड्रग्ज रॅकेट प्रकरणात सहायक फौजदार जनार्दन काळे, पोलिस कर्मचारी विशाल ठोपले, स्वप्निल शिंदे आणि दिगंबर चंदनशिव यांना, तर पलायन प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, हवालदार आदेश शिवणकर, पोलिस नाईक नाथाराम काळे, पिरप्पा बनसोडे आणि अमित जाधव यांना निलंबित केले आहे. याप्रकरणी अपर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया आणि पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी वेगवेगळे आदेश काढले आहेत. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
ललित पाटील हा ड्रग्ज माफिया आहे. त्याच्या बंदोबस्तासाठी कोर्ट पार्टी नियुक्त केली होती. दोन दिवसांपूर्वीच ससून रुग्णालयात २ कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडले होते. त्यात ललित पाटील हा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले होते. त्याच्याकडे दोन महागडे मोबाइल आढळून आले होते. अधिक चौकशीसाठी गुन्हे शाखेने ससून रुग्णालय व कारागृहाकडे पत्र दिले होते. या आरोपीच्या बंदोबस्तासाठी पोलिस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे व इतरांची नेमणूक केली होती. असे असताना ललित पाटील याला एक्स-रे काढण्यासाठी तळमजल्यावर आणण्यात येत असताना पोलिसांच्या हाताला हिसका देऊन ताे पळून गेला.