लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गुन्ह्यातील एखादा महत्त्वाचा धागाच पोलिसांना आरोपीपर्यंत घेऊन जातो, असे अनेकदा दिसून आले आहे. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकाविणाऱ्याच्या अंगावर पांढरे डाग असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी चोरट्याला पकडले.
अमोल विश्वनाथ शेरखाने (वय ३६, रा. आंबेगाव) असे या चोरट्याचे नाव आहे. रविवार पेठेतील एक ८२ वर्षांच्या वृद्ध महिला ८ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता शुक्रवार पेठेतील जैन मंदिरात देवदर्शनासाठी घेऊन परत घरी जात होत्या. सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील जिन्यावर त्या आल्या असताना चोरट्याने त्यांचा पाठलाग करून गळ्यातील १ लाख ३५ हजार रुपयांचे सोनसाखळी हिसका मारून चोरून नेली.
या गुन्ह्यात तपास करीत असताना खडक पोलिसांना संशयित चोरट्याच्या शरीरावर पांढरे कोड असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले. त्यावरून पोलिसांनी आपला सर्व रोख पांढरे कोड असलेल्यांवर केंद्रित केला. पांढरे कोड असलेल्या व्यक्तीचा शोध घेत असताना सहायक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे हे हिराबाग येथे असताना त्यांना तेथील स्नॅक्स सेंटरजवळ एका पांढरे कोड असलेली व्यक्ती थांबलेली दिसली. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. सुरुवातीला त्याने तो मी नव्हेच असे सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्याला ते सीसीटीव्ही फुटेज दाखविले. तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे, सहायक निरीक्षक सुशील बोबडे, पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, विक्रम मिसाळ, राहुल घाडगे, पोलीस हवालदार फहिम सैय्यद, संदीप पाटील अनिकेत बाबर, रवी लोखंडे, समीर माळवदकर, बंटी कांबळे, राहुल मोरे, हिम्मत होळकर, कल्याण बोराडे, विशाल जाधव, किरण शितोळे, तेजस पांडे, दिनेश खरात यांनी ही कामगिरी केली.
----------------
९० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
पांढरे डाग असलेल्या या संशयित चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकांनी शहरातील जवळपास ९० सीसीटीव्ही फुटेज तपासले. ते तपासत त्यांनी शुक्रवार पेठेपासून अगदी बिबवेवाडीपर्यंत माग काढला. अंगावर पांढरे कोड असलेल्या १० ते १२ जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. जवळपास १० ते १५ दिवस त्याचा शोध सुरू होता. खडक पोलीस ठाण्यातील सर्व जण पांढरे डाग असलेल्याचा शोध घेत असतानाच सुशील बोबडे यांच्या चाणाक्ष नजरेत हा आरोपी आढळून आला.
अमोल शेरखाने हा मूळचा उस्मानाबादचा राहणारा आहे. तो सिंहगड रोड येथील एका दुकानात तो कामाला होता. ग्राहकाशी वादावादी केल्याने त्याला नोकरीवरून काढून टाकले होते. त्यानंतर तो महिना दोन महिने हॉटेलमध्ये काम करायचा. त्याच्यावर कर्जही झाले होते. त्यातूनच त्याने ही चोरी केल्याचे पोलिसांना त्याने सांगितले.