निनाद देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना विषाणूला अटकाव घालण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण माेहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ९० लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. जिल्ह्यात नाेंदणीकृत ७८ लाख ८७ हजार ८७४ मतदार आहेत. त्याहीपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण करत जिल्हा राज्यात अव्वल आला आहे. जवळपास ११५ टक्के लसीकरण आतापर्यंत झाले आहे.
राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक काेरोना रुग्ण आढळले होते. पुणे जिल्ह्याचा रुग्ण बाधितांचा दरही राज्यात सर्वाधिक होता. हा दर आटोक्यात आणण्यासाठी वेगाने लसीकरण होणे गरजेचे होते. त्यानुसार जानेवारी महिन्यात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. ग्रामीण भागात ३६ लाख २ हजार ६२४ नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते तर पुणे शहरात ३० लाख ९२७ नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट होते. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड परिसरातील १९ लाख ३६ हजार १५४ नागरिक असे मिळून ८५ लाख ३९ हजार ७०६ जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट होते. यात फ्रंटलाईन वर्कर, आरोग्यसेवक, ४५ आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले होते. १ हजार २८५ लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. सुरुवातीला लसींचा पुरवठा मर्यादित होत होता. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवता येत नव्हता. लस पुरवठ्याबाबत ओरड झाल्यानंतर काही प्रमाणात पुरवठा सुरळीत झाला. मात्र, ग्रामीण भागात लोकसंख्येच्या तुलनेत पुरवठा होत नव्हता. रोज एक लाख नागरिकांच्या लसीकरणाची क्षमता असतानाही लसीअभावी पूर्ण क्षमतेने लसीकरण करता येत नव्हते. मात्र, हा पुरवठा आता सुरळीत झाला असून, अडीच लाख लसीकरणाचा विक्रमही पुणे जिल्ह्याने केला.
गुरुवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, ६२ लाख ९२ हजार ८७७ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. याचे प्रमाण जवळपास ७४ टक्के आहे तर २४ लाख ७२ हजार ३३७ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला असून, याचे प्रमाण २९ टक्के आहे. शनिवारपर्यंत एकूण ९० लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
चौकट
विषेश गटांच्या लसीकरणातही आघाडी
जिल्ह्यात विषेश गटांतील नागरिकांच्या लसीकराचीही विषेश मोहिम राबिवण्यात आली आहे. यात दिव्यांग लसीकरण, तृतीयपंथी, गरोदर माता, अंथरूणावर असलेले नागरिक, परदेशी शि५षणासाठी जाणारे विद्यार्थी, तसेच आैद्योगिक क्षेत्रातील नागरिकांचा समावेश आहे. ग्रामीण भागासह पुणे आणि पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील ७ लाख १ हजार ५७९ नागरिकांचे लसीकरण करन्यात आले आहे.
चौकट
जिल्ह्यात नोंदणीकृत मतदार यादीत ४१ लाख २८ हजार ३९२ पुरुष आहेत. तर ३७ लाख ५९ हजार २८९ महिला मतदारांची संख्या आहे. तर १९३ तृतीय पंथी आहेत. असे एकुण ७८ लाख ८७ हजार ८७४ नोंदणीकृत मतदारांची संख्या आहे.
कोट
जिल्ह्यातील ९० लाख नागरिकांचे लसीकरण करून जिल्हा राज्यात पहिला आला आहे. लसीकरणासाठी आम्ही विषेश अभियान राबविले होते. याचा फायदा होतांना आज दिसत आहे. लसीकरणामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित दर हा आटोक्यात आणण्यात यश आले आहे. येत्या काळातही लसीकरणाची मोहिम ही सुरुच ठेवली जाणार आहे.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी