पुणे : छत्रपती शिवाजी महाराज की जय... हर हर महादेव... एक मराठा, लाख मराठा.. अशा घोषणा देत भगवे झेंडे घेऊन लाखो मराठा बांधव मनोज जरांगे पाटलांसोबत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. जरांगे पाटलांचा काल पुण्यात प्रवेश झाला. तोच उत्साह, जल्लोष पाटलांवर ती फुलांची उधळण अशा वातावरणात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले. आज सकाळी मनोज जरांगे पाटील वाघोलीत दाखल झाले आहेत. आता ते वाघोलीतून खराडीकडे रवाना झाले आहेत. या मोर्चामध्ये असणाऱ्या काही मराठा बांधवांशी लोकमतने संवाद साधला.
आम्ही आरक्षण घेऊनच परत येऊ, आत्महत्या करू पण आरक्षण घेतल्याशिवाय येणार नाही. सरकारला आमच्यासमोर झुकावंच लागेल. मुंबईला जाऊन हे घेतलयाशिवाय जाणार नाही. शासनाने आम्हाला दोन वेळा भूलथाप घेऊन फसवले आहे. आज आमचा मुलगा ९० टक्के पाडूनसुद्धा घरात बसलाय. आणि ४० टक्के पाडणाऱ्याला लगेच नोकरी मिळते. जरांगे पाटलांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आम्हाला १०० टक्के आरक्षण पाहिजे. आम्ही गोळ्या छातीवर घेण्यास तयार आहोत. गावातून आम्ही सर्व साहित्य घेऊन आलो आहोत. गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलंय कि आरक्षण घेतल्याशिवाय येऊ नका. आमचा जरांगे पाटील आहे. आम्ही पक्षपाती आहोत, आम्हाला कोणावर टीका करायची नाही आणि कोणाचीही चमचेगिरी करायची नाही. संपूर्ण समाज मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी आहे. ओबीसी, मराठा सगळेच त्यामध्ये आहेत. हे नेतेच आरक्षणावरून समाजात भांडण लावत आहेत. अशा प्रतिक्रिया मराठा बांधवांनी दिलाय आहेत.
गावागावातून चपाती, शेंगदाणा चटणी
पदयात्रेतील सहभागी बांधवांसाठी शिरदाळे व खडकी ग्रामस्थांनी चटणी-भाकरी अशी भोजनाची व्यवस्था केली. खडकी ग्रामस्थांच्या पुढाकाराने साडेतीन हजार चपात्या, पन्नास किलो शेंगदाण्याची चटणी, ५० किलो लसणाची चटणी यांचे वाटप मराठा बांधवांना करण्यात आले. रांजणगाव गणपती-कारेगाव परिसरातील सर्व गावांत चपाती आणि शेंगदाणा चटणी करण्यात आली होती. सोमवारी दुपारपर्यंत प्रत्येक गावात महिलांमध्ये स्वयंपाकाची लगबग सुरू होती. काही गावांतून लापशी, डाळ-भात सुद्धा विसाव्याच्या ठिकाणी पोहोचविण्यात आला होता.