पुणे: शहराची सांस्कृतिक प्रतिमा समजला जाणाऱ्या यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता २८ सप्टेंबर रोजी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी होत आहे. दरवर्षीप्रमाणे पुणेपोलिस दल देखील बंदोबस्तासाठी सज्ज झाल्याची माहिती पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. शहरात ३ हजार ८६५ सार्वजनिक गणेश मंडळे असून ६ लाख १४ हजार २५७ गणरायांची घरात स्थापना झालेली आहे. पुणे पोलिसांकडून विसर्जन मिरवणुकीवेळी सगळे सुरळीत आणि वेळेत व्हावे यासाठी वेळोवेळी गणेश मंडळांसह ढोल-ताशा पथकांसोबत समन्वय बैठका घेण्यात आल्या होत्या, अशी माहिती देखील आयुक्तांनी दिली.
२८ सप्टेंबर गुरुवारपासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत ९ हजार पोलिसांचा खडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर २०५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखील लक्ष ठेवले जाणार आहे. पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह या मार्गावरील खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखील पोलिस निगराणी ठेवणार आहेत. या पत्रकार परिषदेवेळी पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक शाखेचे पोलिस आयुक्त विजयकुमार मगर, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांची उपस्थिती होती.
असा असेल पोलिस बंदोबस्त..
१ - पोलिस आयुक्त१ - सह पोलिस आयुक्त४ - अप्पर पोलिस आयुक्त१० - पोलिस उपायुक्त
२५ - सहायक पोलिस आयुक्त१५५ - पोलिस निरीक्षक५७८ - सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक६ हजार ८२७ - पोलिस अंमलदार
९५० - होमगार्ड२ - एसआरपीएफ च्या कंपन्या
या कालावधीत लोकांना वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच २६ ठिकाणी पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. नागरिकांना वाहतूक मार्गदर्शनासाठी ‘सारथी गणेशोत्सव गाईड २०२३’ चे फलक जागोजागी लावण्यात येत आहेत. महिला छेडछाड, चैन स्नॅचिंग सारख्या घटना घडू नयेत यासाठी विशेष पथके साध्या वेशात तैनात केली जाणार आहेत.
विसर्जन मिरवणुकीत वैद्यकीय मदत पथक
पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासच्या वतीने यंदा गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत आपत्कालीन वैद्यकीय मदत पथक कार्यरत असणार आहेत. बेलबाग चौक, ग्राहक पेठ समोर (टिळक रोड), पूरम चौक, टिळक चौक अशा चार ठिकाणी हे वैद्यकीय पथक असणार आहे.
आपत्कालीन फोन नंबर वैद्यकीय मदत फोन नंबर
डॉ. मिलिंद भोई - विश्वस्त, पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यास ९८२२०७५५५
डॉ. कुणाल कामठे ९८०६१३६५
डॉ. शंतनू जगदाळे ९०११९१६६०७
डॉ. नंदकिशोर बोरसे ९४२२०३२६९६
सदाशिव कुंदेन ९९२१५७४४९९ .