वडगाव मावळ : पवना नदीतून शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी परवानगी मिळवून देण्यासाठी ९० हजार रुपयांची लाच घेतली. याप्रकरणी तळेगाव येथील पवना पाटबंधारे कार्यालयातील महिला लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
मोनिका रामदास ननावरे (वय ३१, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे अटक केलेल्या महिला लिपिकाचे नाव आहे. तक्रारदार यांनी करंजगाव येथील शेतीला पवना नदीपात्रातून पाणी परवाना मिळविण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील पवना पाटबंधारे विभागात अर्ज केला होता. पाणी परवाना मिळवून देण्यासाठी मोनिका ननावरे यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख २० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडी करून ९० हजार रुपये देण्याचे ठरले होते.
त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयात तक्रार केली होती. पोलीस निरीक्षक अलका सरग, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक सुनील बिले, पोलीस हवालदार टिळेकर, पोलीस नाईक वैभव गोसावी, चालक पोलीस हवालदार प्रशांत वाळके यांच्या पथकाने सापळा रचून मोनिका ननावरे यांना ९० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.