लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत रुग्णालयातील मनुष्यबळ अपुरे ठरत आहे. त्या पार्श्वभूमीवर मागील पंधरा दिवसांत जिल्हा परिषदेकडून कंत्राटी स्वरूपात तब्बल ९०१ मनुष्यबळ उभे केले आहे. यात एमडी डाॅक्टरापासून ते वैद्यकीय अधिकारी यांच्यासह नर्स, आरोग्यसेविका, क्ष-किरण तंत्रज्ञ यांची नियुक्ती केली आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरासह ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. एक महिन्याभरात या लाटेने जिल्ह्यात कहर माजवायला सुरवात केली. विशेषत: ग्रामीण भागात बाधितांची संख्या दुप्पट ते तिपटीने वाढू लागल्यामुळे उपचारासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली. अशा परिस्थितीत ग्रामीणमध्ये रूग्णांना उपचार देताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य विभागावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे कोविड सेंटरही बंद ठेवले. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आरोग्य सभापती प्रमोद काकडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्काळ ठोस पावले उचलत कंत्राटी पध्दतीने पदभरती करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार मागील पंधरा दिवसांत (३१ मार्च ते १५ एप्रिल) २८ एमबीबीएस डॉक्टर, ५४ बीएएमएस डॉक्टर, ७८ बीडीएस डॉक्टर यांची नियुक्ती केली. त्याचबरोबर ११४ स्टाफ नर्स, ४०० आरोग्य सेविका, १३० डाटा ऑपरेटर, १५ क्ष-किरण तंत्रज्ञ, ८ इसीजी तंत्रज्ञ आणि ९ हॉस्पिटल मॅनेजर यांची नियुक्ती केली आहे. १३ तालुक्यांसाठी ही नियुक्ती असून त्यामध्ये एमबीबीएस डॉक्टरांची संख्या तुलनेने कमी होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी केवळ ६ एमबीबीएस डॉक्टर कार्यरत होते, तर आज नव्याने भरती केल्यामुळे एमबीबीस डॉक्टरांची संख्या २८ झाली आहे.